पंढरपूर – एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग व आय.ई.टी.ई. क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘मेंटॉरबाइट – अ बाइट ऑफ ग्रॅटिट्यूड फॉर अवर मेंटॉर्स’ या विशेष उपक्रमाचे आयोजन शनिवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले.
‘मार्गदर्शकांचा सन्मान, गुरुजनांचा गौरव आणि उज्ज्वल भविष्याची प्रेरणा’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी ज्ञानविषयक व्याख्याने, गुरुजनांच्या कार्याचा गौरव करणारे नाट्य व नकलानाट्य, तसेच ‘कौतुक पेटी’च्या माध्यमातून शिक्षकांप्रती कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. यावेळी शिक्षकांसाठी स्मरणशक्ती चाचणी, तर्कशक्ती व आठवण आव्हाने, बुद्धिकौशल्य चाचणी आणि मनोरंजक उपक्रमांवर आधारित तांत्रिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
याबाबत माहिती देताना इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासामध्ये शिक्षक आणि मार्गदर्शकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञता, आदर आणि आत्मीयतेची भावना निर्माण करण्यास उपयुक्त ठरते.
कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाचा योग्य उपयोग करून ज्ञान, कौशल्य व संस्कारांच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहन केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अल्ताफ. मुलाणी, प्रा. वैभव
गोडसे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आय.ई.टी.ई विद्यार्थी प्रतिनिधी कु.श्रावणी हुंडेकरी, कु.श्रुती बजाज तसेच विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाद्वारे “भविष्य घडविणाऱ्या गुरुजनांना मनःपूर्वक धन्यवाद” हा संदेश देण्यात आला.
Post Views: 9