सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्याबाबत विविध सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या काळात डीजे व डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करावा, तसेच गणेश मंडळांनी जास्तीत जास्त समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन करण्यात आले.
प्रत्येक गणेश मंडळाने पोलीस ठाण्याकडून आवश्यक परवानगी घ्यावी. गणेशमूर्तीच्या सुरक्षेसाठी मंडपात दोन कार्यकर्ते नियमित उपस्थित ठेवावेत. गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी पोलिसांनी दिलेल्या वेळेचे व सूचनांचे पालन करावे, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.
उत्कृष्ट गणेश मंडळांना तालुकास्तरापासून विभागीय स्तरापर्यंत बक्षिसे देण्यात येणार असल्याने मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
बैठकीस सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील, गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते असे सुमारे १०० ते १२५ जण उपस्थित होते. बैठकीची प्रस्तावना व आभार सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी केले.
ही बैठक सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सोलापूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी आयोजित केली होती. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, प्रवीण जर्दे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहलता सुपे, सीमा डोंगरीतोट व पोलीस अंमलदार उपस्थित होते.





















