पंढरपूर – येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात समारंभ समिती व सेवक कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब लिगाडे उपस्थित होते.
कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य जे. बी. धायगुडे, डॉ. राजेंद्र जाधव, अमरजीत पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे, डॉ. बजरंग शितोळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवक कल्याण विभागाचे चेअरमन प्रा. डॉ. उमेश साळुंखे यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे नानासाहेब लिगाडे म्हणाले की, “रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील नावलौकिक प्राप्त संस्था असून सेवक, शिक्षक यांच्या त्याग, श्रम, कष्ट व योगदानातून तिची उभारणी झाली आहे. शिक्षक आपल्या विचार, वर्तन, चालणे-बोलणे आणि कृतीतून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करतात. स्वाभिमानी शिक्षक विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहतात.”
रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आणि शिक्षक असणे हा आपल्या जीवनातील मोठा गौरव असल्याचे सांगून लिगाडे यांनी शिक्षण व्यवस्थेतील बदलांवर भाष्य केले. अमेरिका, इस्राईल आणि भारतातील शिक्षण पद्धतींची तुलना करताना मातृभाषेतून शिक्षण देणे हा आदर्श शिक्षणाचा मूलभूत सिद्धांत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेली ‘कमवा व शिका’ योजना आज जगातील विविध शिक्षण व्यवस्थांमध्ये विविध स्वरूपात राबविली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. रयत शिक्षण संस्थेने गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी ‘रयत गुणवत्ता विकास आराखडा’ तयार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव म्हणाले की, “शिक्षक हा एक व्रत घेऊन आपले कर्तव्य बजावत असतो. विद्यार्थी हा शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू असून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याबरोबरच मानवी, सामाजिक व जीवनमूल्यांची रुजवणूक करणे हे शिक्षकांचे महत्त्वाचे कार्य आहे.”
रयत शिक्षण संस्था हे एक कुटुंब असून या कुटुंबातील सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा महाविद्यालयात आमंत्रित करून त्यांचा सन्मान करणे ही आनंदाची व अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. “ज्या देशातील शिक्षक आधुनिक व पुरोगामी विचारांचे असतात, तोच देश प्रगतीच्या उंच शिखरावर पोहोचतो. समाजाची व विद्यार्थ्यांची गरज ओळखून समाज सक्षमीकरणासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले प्राचार्य डॉ. मधुसूदन बचुटे, आप्पा पाटील सर, डॉ. भगवान नाईक नवरे, डॉ. एन. एन. तंटक, डॉ. विकास कदम, डॉ. कांतीलाल बागल यांच्यासह अनेक रयत सेवकांचा सन्मान करण्यात आला. कार्यरत शिक्षकांचाही पेन, डायरी व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे व प्रा. रोहिणी बावचकर यांनी केले, तर महेश कोंडूभैरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 15