पंढरपूर – ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रलंबित बिल, शेतीपंपांचा वीजपुरवठा, बिबट्याचा बंदोबस्त, ऊसावरील पायरीला रोग, खते व कृषी औषधांच्या वाढत्या किमती तसेच विजेच्या दुर्घटनांमध्ये मृत्यू झालेल्या शेतकरी कुटुंबांना मदत यांसह विविध मागण्यांसाठी ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयावर ‘बोंबाबोंब आंदोलन’ करण्यात आले. आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना शेतकरी नेते सचिन पाटील म्हणाले, “शेतीपंपाची लाईट बंद केल्यामुळे जर शेतकऱ्यांची पिके जळाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचे पालक म्हणून शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि जीवाचे रक्षण करण्याची जबाबदारी घ्यावी. शेतकऱ्यांसाठी पाणी आणि विजेचे नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे,” अशी टीका करुन पिके वाचवण्यासाठी तातडीने शेतीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करा,” अशी मागणी केली.
———————
चौकट : ( पोळ्याच्या ऊसबिलासाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न )
दरम्यान, चंद्रकांत बागल नावाच्या एका शेतकऱ्याने पोळ्याला देण्यात येणाऱ्या ऊस बिलाच्या मागणीसाठी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे आंदोलनस्थळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेत मिळत नसल्याने निर्माण झालेली ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून शासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
—————-
चौकट : ( तहसीलदारांनी अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी बोलावले )
दरम्यान, पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे, नायब तहसीलदार बालाजी पुदलावड आणि पन्हाळकर यांनी आंदोलनाची दखल घेतली. त्यांनी महावितरण (MSEDCL), वन विभाग आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी बोलावून घेतले. यावेळी शेतीपंपांचा वीजपुरवठा, गादेगाव परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त, ऊसावरील पायरीला रोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना आणि इतर मागण्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.
—————-
चौकट : ( या आहेत प्रमुख मागण्या )
पोळा सणासाठी परंपरेप्रमाणे ऊस बिलाचा दुसरा हप्ता तातडीने द्यावा.शेतीपंपांचा अचानक कपात केलेला वीजपुरवठा सुरळीत करावा.वीजेअभावी पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.गादेगाव परिसरातील बिबट्याला तातडीने पकडून सुरक्षित अधिवासात सोडावे.ऊसावरील पायरीला रोगाच्या नियंत्रणासाठी साखर कारखान्यांनी माफक दरात ड्रोन उपलब्ध करून द्यावेत.खते व कृषी औषधांच्या वाढत्या किमतींवर शासनाने नियंत्रण आणावे.शेतात विजेचा करंट लागून मृत्यू झालेल्या शेंडगे व नागणे कुटुंबांना तत्काळ शासकीय मदत द्यावी.
———————-
चौकट : (मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा )
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी भूमिका ऊस दर संघर्ष समितीने घेतली आहे. “आज शेतकरी आपल्या हक्कासाठी तहसील कार्यालयावर आवाज उठवत आहे. उद्या हा आवाज जिल्हाभर पोहोचेल. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची पुढील दिशा अधिक तीव्र असेल,” असा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी दिपक भोसले, समाधान फाटे, तानाजी बागल, सचिन पाटील, नितीन बागल, माऊली जवळेकर, निवास नागणे, रायाप्पा हळणवर, शेखर आटकळे, शहाजन शेख, चंद्रकांत बागल, राहूल पवार, बाळासाहेब जगदाळे, गणेश लामकाने, शहाजी जगदाळे, रामदास घाडगे, शेखर आटकळे, प्रकाश गाजरे, अनिल बागल, मधुकर बागल, दशरथ जवळेकर, विनोद बागल, दिपक पाटील, रमेश नागणे, भिमराव नागणे, विक्रांत जगदाळे, ॠषीकेश नागणे, वैभव नागणे, अनिल नागणे आदींपदाधिकाऱ्यांसह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Post Views: 20