सोलापूर : आपली तक्रार/ माय सोलापूर ॲप व लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अर्ज मुदतीत निकाली न काढल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेने ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकूण २३ हजार ८०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. संबंधितांकडून नियमानुसार दंड वसूल करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त सोनाली यादव यांनी काढले आहेत.
महापालिकेच्या ‘आपली तक्रार’ पोर्टल, ‘माय सोलापूर’ ॲप तसेच लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत प्रलंबित अर्जांची दखल घेत प्रशासनाने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. मुदतीत तक्रारी व अर्ज निकाली न काढणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून नियमानुसार दंड वसूल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. महापालिकेने नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी ऑनलाइन तक्रार प्रणाली सुरू केली आहे. तसेच लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत १३६ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. या सेवांशी संबंधित अर्ज वेळेत निकाली काढणे व पोर्टलवरील माहिती अद्ययावत ठेवण्याच्या सूचना यापूर्वीही देण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप अनेक तक्रारी व अर्ज प्रलंबित असल्याचे आढळून आल्याने कारवाई केली आहे.
आपली तक्रार माय सोलापूर ॲप वर प्रकरणे प्रलंबित ठेवल्याप्रकरणी १९ कर्मचाऱ्यांना ६ हजार १५० तसेच लोकसेवा अधिनियम हक्क अंतर्गत अर्ज प्रलंबित ठेवल्याने २१ कर्मचारी व अधिकाऱ्यांना १७ हजार ६५० असे एकूण ४० कर्मचारी व अधिकाऱ्यांना एकूण २३ हजार ८०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. हा दंड संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोबरच्या वेतनातून वसूल करावे, असे आदेशात नमूद केले आहे.
—-
Post Views: 22