पंढरपूर – आधीच पावसाने दिलेली ओढ आणि त्यामध्ये पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे हा प्रश्न मांडला. यावर पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली आहे.
पंढरपूर माढा, सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सलग आठ-आठ दिवस वीजपुरवठा खंडित राहणे, कमी-अधिक दाबाने वीज मिळणे तसेच जळालेले ट्रान्सफॉर्मर (डीपी) वेळेत बदलले जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. तसेच रात्रीच्या वेळी महावितरणकडून कधीही अचानक लाईट घालवली जाते आणि कधीही सोडली जाते, या अनियंत्रित वेळापत्रकामुळे रात्रीच्या वेळी शेताला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असून त्यांचा जीव धोक्यात येत आहे.शेतकऱ्यांची ही समस्या प्रशांत परिचारक यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मांडली. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत तातडीची विशेष व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी, महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी, आमदार समाधान आवताडे उपस्थित होते.
पंढरपूर माढा, सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांत वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे शेतीपिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. उजनी कॅनॉल, एनआरबीसी कॅनॉल तसेच नदीमध्ये पाणी उपलब्ध असतानाही केवळ वीजपुरवठ्याअभावी पिके धोक्यात येत असल्याची गंभीर बाब बैठकीत मांडण्यात आली. आमदार समाधान आवताडे यांनी महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांच्या समस्या प्रशासनासमोर ठामपणे मांडल्या.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महावितरण प्रशासनाला वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर तातडीने आणि युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे कडक निर्देश दिले.पालकमंत्र्यांनी रात्रीच्या ऐवजी शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत आणि पूर्ण दाबाने वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केली. आठ दिवसांपासून बंद असलेला पुरवठा तत्काळ सुरू करा ज्या भागात दीर्घकाळापासून वीजपुरवठा खंडित आहे, तेथील तांत्रिक बिघाड तातडीने दूर करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले. जळालेले डीपी त्वरित बदला, ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर तो बदलण्यासाठी होणारा विलंब थांबवून नवीन डीपी तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. मंजूर डीपी युद्धपातळीवर बसवा जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर करण्यात आलेले सर्व नवीन ट्रान्सफॉर्मर विनाविलंब बसवण्याचे आदेश देण्यात आले. कमी-अधिक दाबाची समस्या सोडवा वीजपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी दूर करून शेतकऱ्यांना सुरळीत आणि पूर्ण दाबाने वीज मिळेल, यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शेतकऱ्यांना वारंवार वीज समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी महावितरणने अधिक कार्यक्षमतेने आणि जबाबदारीने काम करण्याची अपेक्षा सर्वांनीच व्यक्त केली.बळीराजाला अडचणीत आणणारा महावितरणचा मनमानी कारभार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, वीजपुरवठ्याशी संबंधित सर्व प्रश्न मार्गी लागेपर्यंत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल,” असा निर्धार यावेळी प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला.
Post Views: 19