सोलापूर – सोलापूरची विमानसेवा पुन्हा बंद झाल्याच्या निषेधार्थ शहर युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर कागदी विमाने उडवत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी आंदोलकांनी विमानसेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली. विमानसेवेच्या प्रश्नाकडे सरकारकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक विमानांवर पंतप्रधान, पालकमंत्री, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे फोटो लावले होते. ‘विमानसेवा सुरू करा’, ‘केंद्र सरकार मुर्दाबाद’, ‘पालकमंत्री मुर्दाबाद’ अशा घोषणांनी विमानतळ परिसर दणाणून गेला.
यावेळी गणेश डोंगरे यांनी सरकारवर निशाणा साधला. “निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर विमानतळाचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. विमानसेवा सुरू करण्याच्या आश्वासनांवरून जनतेची दिशाभूल करण्यात आली. मात्र, सेवा वारंवार सुरू-बंद होत असून आता ती पूर्णपणे ठप्प झाली आहे,” असा आरोप शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी केला.
विमानसेवेसाठी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली आणि अनेक कुटुंबांवर परिणाम झाला. एवढ्या मोठ्या प्रक्रियेनंतरही सोलापूरला स्थिर आणि नियमित विमानसेवा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या दृष्टीने विमानसेवा महत्त्वाची असून सरकारने केवळ उद्घाटन आणि आश्वासनांपुरते मर्यादित न राहता कायमस्वरूपी सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलनात सचिन पवार, विनोद पाटील, सुशिलकुमार म्हेत्रे, योगेश रणधीरे, विवेक इंगळे, अब्दुल हाफीज मुल्ला, प्रतीक शिंगे, चंद्रकांत नाईक, यासीन शेख, सोपान मिसाळ, अमोल माशाळे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 37