पंढरपूर – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चक्क दस्तुरखुद्द नगराध्यक्षांसह सत्ताधारी आणि विरोधी असलेल्या भाजपा आणि शिंदेसेनेच्या सर्व नगरसेवकांनी एकप्रकारे नकार घंटा वाजवित भुसंपदानाच्या ठरावाला स्थगिती दिली. मात्र, त्यानंतर काही तासांतच कोणत्याही परिस्थितीत कॉरिडॉरचे काम होणारच अशी सोशल मीडियावर पोस्ट करत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एकप्रकारे पालिकेला तंबीच दिली. दरम्यान या परस्परविरोधी भूमिकांमुळे आगामी काळात पंढरपुरात येथील नगरपालिके विरुध्द शासन आणि प्रशासन असा थेट संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात होवू लागली आहे.
राज्य सरकारने कॉरिडॉरसाठी नुकताच सुमारे चार हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला असून, येत्या पंधरलपा दिवसांत भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. शासन पातळीवर प्रकल्पाच्या हालचालींना वेग आला असतानाच स्थानिक नगरपालिकेने विरोध केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कॉरिडॉर मंजुरीचा ठराव मांडण्यात आला. मात्र, नगराध्यक्षांसह सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी त्याला विरोध केला. या घडामोडीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोशल मीडियावर सरकार या प्रकल्पावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. कॉरिडॉरचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होईल, असे त्यांनी सूचित केले. त्यामुळे भविष्यात पंढरपूर नगरपालिका विरुद्ध शासन आणि प्रशासन असा नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
—————–
(श्रद्धेचा सन्मान, परंपरेचे जतन आणि विकासाची नवी दिशा : पालकमंत्र्यांची पोस्ट )
‘विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल. पंढरपूर हे कोट्यवधी वारकऱ्यांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे पवित्र केंद्र आहे. या पवित्र भूमीचा विकास करताना वारकरी परंपरा, संस्कृती आणि अध्यात्माचा गाभा जपत भविष्यातील गरजा लक्षात घेऊन चार हजार १५० कोटी ४६ लाख रुपयांचा सर्वसमावेशक पंढरपूर कॉरिडॉर विकास आराखडा साकारला जात आहे. कॉरिडॉरच्या आराखड्याअंतर्गत आधुनिक पायाभूत सुविधा, स्कॉय ऑफ चंद्रभागा, घाटांचा विकास, वारकऱ्यांसाठी अधिक दर्जेदार सुविधा आणि तीर्थक्षेत्राचे नियोजनबद्ध सुशोभीकरण यावर विशेष भर देण्यात आला आहे. हा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे, पर्यटनाला बळकटी देणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हेही या प्रकल्पाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. श्रद्धेचा सन्मान, परंपरेचे जतन आणि विकासाची नवी दिशा यांचा समतोल साधत पंढरपूरला जागतिक दर्जाच्या तीर्थक्षेत्राच्या दिशेने नेण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
Post Views: 11