पावसाने मोठा खंड दिल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणी पिके सुकून गेली आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर पीक काढून पुढील पिकासाठी जमीन तयार करण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत पीक काढण्यापूर्वीच पीक कापणी प्रयोग घेण्याचे निर्देश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत. पीक नुकसान आणि पिकांच्या स्थितीचा विचार करून पीक कापणी प्रयोग वेळेत घेण्याची मागणी आपण केली होती. त्यानुसार ऑक्टोबर ऐवजी सप्टेंबर महिन्यात पिक कापणी प्रयोग घ्यावे असे निर्देश कृषी आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पीक कापणी प्रयोगाच्या आधारे संबंधित महसूल मंडळातील पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत झालेली घट विचारात घेऊन नुकसानभरपाई निश्चित केली जाते. त्यामुळे पीक कापणी प्रयोग अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे. सामान्य परिस्थितीत पीक कापणीस तयार झाल्यानंतर कापणी प्रयोग घेतला जातो. मात्र, अवर्षण, अतिवृष्टी, पूर किंवा मोठ्या प्रमाणातील कीड-रोगामुळे पीक वाया जाण्याची अथवा नष्ट होण्याची शक्यता असल्यास आणि शेतकऱ्याला मुदतपूर्व पीक काढावे लागण्याची परिस्थिती उद्भवल्यास, संबंधित शेतात वेळेआधी पीक कापणी प्रयोग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळी कागदावरील आकड्यांपेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर असलेल्या वास्तविक उत्पादनाची नोंद करणे बंधनकारक आहे. पीक कापणी प्रयोगातून नोंदविलेले वास्तविक उत्पादन हे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ‘पीक सुकले म्हणून काढून टाकू’ असे न करता, आधी पीक कापणी प्रयोग करून घेणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.पावसाच्या खंडामुळे अनेक शेतकऱ्यांना मुदतपूर्व पीक काढावे लागू शकते. अशा शेतकऱ्यांचे नुकसान योग्य पद्धतीने नोंदवले जावे आणि त्यांना विमा योजनेचा दिलासादायक लाभ मिळताना अडचण येऊ नये, यासाठी हा विषय सातत्याने आमदार पाटील यांनी शासन दरबारी मांडला. आता कृषी आयुक्तांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. संबंधित शेतकरी बांधवांनी यंत्रणेशी संपर्क साधून पीक कापणी प्रयोग पूर्ण करून घ्यावा, असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
शेतकरी बांधवांनी काय करावे?
धाराशिव जिल्ह्यात उडीद, मूग व सोयाबीन या पिकांचे एकूण १,०६९ प्लॉट पीक कापणी प्रयोगासाठी निश्चित करण्यात आले आहेत. या प्लॉटधारक शेतकरी बांधवांनी पीक काढण्यापूर्वी महसूल, कृषी किंवा ग्रामविकास विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पूर्वसूचना द्यावी. शेतकऱ्यांनी सूचना दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पीक कापणी प्रयोग पूर्ण करावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पीक कापणी प्रयोग पूर्ण होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी पीक काढू नये.पीक
कापणी प्रयोगासाठी निवडण्यात आलेल्या प्लॉटमध्ये उत्पादन शून्य असल्यास विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या समक्ष पंचनामा करूनच पुढील कार्यवाही करावी. पंचनाम्यासोबत नुकसानग्रस्त क्षेत्राचे Geo-tagged छायाचित्र जोडणे, पंचनामा CCE Agri App वर अपलोड करणे तसेच त्याची प्रत विमा कंपनीच्या प्रतिनिधीला देणे आवश्यक आहे. पीक कापणी प्रयोगाची प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊन शेतकरी बांधवांना पीक विम्याचा लाभ मिळेपर्यंत आपला पाठपुरावा चालू राहणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.





















