बार्शी – योग्य ‘प्रॉम्प्ट’मधून कृत्रिम बुद्धिमत्तेला दिशा देता येते, तर सर्जनशील विचारातून त्याचा विधायक उपयोग करता येतो, असे प्रतिपादन श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांनी केले.
श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : संधी व आव्हाने’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. बी. शेख होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. के. पी. देशमुख यांनी केले. प्रमुख पाहुणे तुषार क्षीरसागर, प्रोग्रॅम मॅनेजर, के. पी. आय. टी., पुणे यांचा परिचय डॉ. राहुल पालके यांनी करुन दिला.
यावेळी तुषार क्षीरसागर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची सुरुवात, औद्योगिक उत्क्रांतीचे विविध टप्पे याचा उहापोह केला. मशिन लर्निंग , सॉफ्टवेअर टेस्टिंग, एजंटिक एआय , ब्लॉकचेन , इंटरनेट ऑफ थिंग्ज’, डीप लर्निंग आदी आधुनिक संकल्पनांची माहिती देताना त्यांनी एआयच्या बदलत्या स्वरुपावर प्रकाश टाकला. योग्य प्रश्न, योग्य सूचना अर्थात प्रॉम्प्टिंग आणि सर्जनशील विचार यांच्या माध्यमातून एआयचा अधिक प्रभावी वापर कसा करता येतो, हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.
शिक्षण, उद्योग, आरोग्य, कृषी, संशोधन, सेवा आणि रोजगार अशा विविध क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या संधींबरोबरच गोपनीयता, अचूकता, नैतिकता, कौशल्यांतील बदल आणि जबाबदार वापर यासारख्या आव्हानांचीही त्यांनी माहिती दिली.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांनी विद्यार्थ्यांनी एआयचे ज्ञान आत्मसात करुन त्याचा जबाबदारीने व विधायक पद्धतीने वापर करावा, असे आवाहन केले. महाविद्यालयातील कर्मवीर इनक्युबेशन व इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नवकल्पना, तंत्रज्ञान आणि सर्जनशीलतेचा संगम घडवून नाविन्यपूर्ण उपक्रम विकसित करावेत, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रा. किरणकुमार खर्डेकर यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 11