सोलापूर : करमाळा तहसील कार्यालयात महिला मंडल अधिकाऱ्याचा विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ करून गंभीर अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले मंडल अधिकारी राजकुमार पांडेकर आणि तलाठी गोरक्षनाथ ढोकणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून निलंबित न केल्यास, जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र हलगीनाद आंदोलन आणि मोर्चा’ काढण्याचा इशारा महाराष्ट्र विकास सेनेने दिला आहे.
करमाळा तहसील कार्यालयातच एका जबाबदार पदावर असलेल्या महिला मंडल अधिकाऱ्यासोबत हा निंदनीय आणि संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात पांडेकर आणि ढोकणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शासनाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांकडूनच असा प्रकार घडल्याने संपूर्ण महसूल विभागाच्या नावाला काळिमा फासला गेला आहे.
या घटनेमुळे प्रशासनातील इतर महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्यापही शासकीय सेवेत कसे काय राहू शकतात? असा सवाल उपस्थित करत या भ्रष्ट आणि विकृत मनोवृत्तीच्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र विकास सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी केली आहे.
प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर महाराष्ट्र विकास सेना पक्ष आणि सर्व नागरिकांच्या वतीने *दिनांक २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र हलगीनाद आंदोलन व मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी कुर्डुवाडी, तहसीलदार व सदर बझार पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे.
Post Views: 34