मोहोळ – तालुक्यातील सारोळे, खवणी, पोखरापूर, यावली, नजीक पिंपरी, आढेगाव व परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचे तसेच पिण्याच्या पाण्याचे शाश्वत साधन उपलब्ध करून देण्यासाठी आष्टी-पोखरापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्र. २ या योजनेचे फेरसर्वेक्षण करून आवश्यक कामांची सुधारित आखणी, अंदाजपत्रक व प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी दि.२२ सप्टेंबर रोजी मंत्रालयात जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टमंडळाने भेट घेतली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य व मोहोळ पंचायत समितीचे भाजपा गटनेते संजीव खिलारे यांनी जलसंपदा मंत्री महोदयांना सविस्तर निवेदन सादर करून या भागातील सिंचनाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. निवेदनात म्हटल्या प्रमाणे, मोहोळ तालुक्यातील कायम दुष्काळप्रवण असलेल्या या भागामध्ये सिंचनाच्या पाण्याची उपलब्धता अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना दीर्घकाळापासून दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने आष्टी-पोखरापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्र. २ ही या भागासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
योजनेअंतर्गत उत्तरेकडील डावी वितरिका अंशतः पूर्ण झाली असून, तिची लांबी व सध्याची पाणि वितरण व्यवस्था लक्षात घेता अपेक्षित सिंचन क्षेत्राला पाणी उपलब्ध होण्यास मर्यादा निर्माण झाल्या आहेत. तसेच दक्षिणेकडील उजव्या वितरिकेचे आवश्यक काम पूर्ण झालेले नसल्याने मोठ्या प्रमाणातील लाभक्षेत्रातील शेतकरी सिंचनाच्या लाभापासून वंचित आहेत.
त्यामुळे योजनेची विद्यमान आखणी, झालेली व अपूर्ण कामे, संभाव्य लाभक्षेत्र, उपलब्ध जलस्रोत, भौगोलिक परिस्थिती आणि प्रत्यक्ष सिंचनाची गरज यांचा सर्वंकष तांत्रिक फेरआढावा घेऊन नव्याने फेरसर्वेक्षण करणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. या फेरसर्वेक्षणाच्या आधारे आवश्यक वितरिका व कालव्यांची सुधारित आखणी करून संबंधित कामांना सुधारित तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात यावी तसेच आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळाने मांडलेल्या मागणीची जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे – पाटील यांनी सकारात्मक दखल घेत सदर प्रश्नाबाबत त्यांनी तात्काळ संबंधित प्रशासनाला आवश्यक त्या उचित सूचना दिल्या.
या मागणीमुळे मोहोळ तालुक्यातील कायम दुष्काळप्रवण भागातील शेतकऱ्यांना कालव्याद्वारे प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळण्यास तसेच संबंधित गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. आष्टी-पोखरापूर योजनेतून पोखरापूर, खवणी व सारोळे या गावांना सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी यापूर्वीही पाठपुरावा झालेला असून या योजनेचा विषय अनेक वर्षांपासून स्थानिक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा राहिला आहे.
यावेळी भाजपाचे राज्य परिषद सदस्य व मोहोळ पंचायत समितीचे भाजपा गटनेते संजीव खिलारे, जिल्हा परिषद सदस्य बालाजी नरुटे, सारोळेचे सरपंच शाहीर भाऊ सलगर, पोखरापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन हर्षद दळवे, खवणी येथील भाजपा युवक कार्यकर्ते देविदास भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 24