अक्कलकोट – जीवनातील प्रत्येक क्षण सकारात्मकतेने स्वीकारत आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी आशावादी दृष्टिकोन आवश्यक आहे. सुख-दुःख, यश-अपयश हे जीवनाचा अविभाज्य भाग असून, परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की जगणे अधिक सुंदर आणि आनंददायी होते, असे प्रतिपादन पंढरपूरच्या उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. सविता दुधभाते यांनी केले.
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स अँड राजा जयसिंह आर्ट्स कॉलेज आणि अक्कलकोट महाविद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त आयोजित बुद्धिक व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प ‘जगणं सुंदर आहे’ या विषयावर गुंफताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उपप्राचार्या वैदेही वैद्य हे होते.
प्रा. दुधभाते यांनी आपल्या व्याख्यानातून जीवनातील सकारात्मक विचारांचे महत्त्व, नातेसंबंधातील जिव्हाळा, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती आणि स्वतःमधील सामर्थ्य ओळखण्याची गरज यावर मार्गदर्शन केले. जीवनात येणाऱ्या अडचणींकडे केवळ समस्या म्हणून न पाहता त्यातून शिकण्याची संधी म्हणून पाहिल्यास व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते. आनंदी जीवनासाठी बाह्य साधनांपेक्षा मनाची सकारात्मकता अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. जी. एस. धबाले, पर्यवेक्षक निलप्पा भरमशेट्टी, पतसंस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रा. दीपीका भकरे यांनी केले. प्रास्ताविक भाषण विजया कोन्हाळी यांनी केले.
वक्तेंचा परिचय स्नेहा लच्याणे यांनी केले. सूत्रसंचालन वैष्णवी चांगभले हिने केले तर पतसंस्थेचे संचालिका शैला गिरी यांनी केले.