सोलापूर – भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या आणि वस्त्रोद्योग निर्यातीत अग्रगण्य भूमिका बजावणाऱ्या ‘पावरलूम डेव्हलपमेंट अँड एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल’च्या (पेडेक्सिल – PDEXCIL) ‘कमिटॉ ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन’ (CoA) वर सोलापूरचे अमितकुमार जैन यांची निवड झाली आहे. संपूर्ण भारतातून या समितीवर केवळ ७ सदस्यांची निवड करण्यात आली असून, अमित जैन यांना Director म्हणून या समितीवर स्थान देण्यात आले आहे.
अमितकुमार जैन हे सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे संचालक असून ‘क्लॉथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ (CMAI) च्या मॅनेजिंग कमिटीचे सदस्य देखील आहेत. याशिवाय, महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग धोरण निर्धारण समितीतही ते महत्त्वाचे योगदान देत आहेत. नुकतीच त्यांची ‘जीतो’ (JITO) सोलापूर चॅप्टरच्या चीफ सेक्रेटरी पदीही नियुक्ती झाली आहे.
मागील १० वर्षांहून अधिक काळ वस्त्रोद्योग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आणि सउद्योगाच्या निमित्ताने जगातील जवळपास 25-30 देशांमध्ये केलेल्या औद्योगिक दौऱ्यांचा अमित जैन यांना दांडगा अनुभव आहे. या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि निर्यात वाढीसाठी मोठा फायदा होईल, या उद्देशानेच त्यांची या उच्चस्तरीय समितीवर निवड करण्यात आली आहे.
या निवडीमुळे येणाऱ्या काळात सोलापूरसह संपूर्ण देशाच्या वस्त्रोद्योग निर्यातीला मोठा वेग मिळेल. त्यांच्या अनुभवाचा वापर करून केंद्र सरकारला निर्यात वाढीसाठी पूरक आणि उद्योजकधार्जिणे धोरण बनवण्यात मोठी मदत होईल, असा विश्वास वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिक आणि विविध संघटनांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.