पंढरपूर – देशात सर्वाधिक उत्पादित होणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था कठीण असून याबाबत शासनाने मदतीचा हात पुढे करावा या मागणी सह विविध प्रश्नाबाबत चर्चा विनिमय करण्यासाठी केळी उत्पादक शेतकरी संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चौथी राष्ट्रीय केळी परिषद ४ ऑक्टोबर रोजी पंढरपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
पंढरपूर नजीक वाखरी येथील आनंदी विनायक मंगल कार्यालय येथे सकाळी नऊ वाजता सदर केळी परिषद आयोजित करण्यात आली असून यास महाराष्ट्रासह विविध ठिकाणाहून २ हजार केळी उत्पादक शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
याविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष किराण चव्हाण, अतुल माने-पाटील, डॉ. हनुमंत चिकणे, किशोर चौधरी, उत्तम पाटील, राजेश नवाल, पंढरीनाथ इंगळे, सचिन कोरडे, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
राज्यात आंबा पिकानंतर सर्वाधिक उत्पादन केळीचे होते. मात्र याबाबत ठोस धोरण नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. २८ हजार कंटेनर निर्यात होणारी केळी युद्धामुळे ५ हजार कंटेनरवर आली आहे. तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती, रोग यामुळे पीक धोक्यात आले आहे, यासाठी पिकविमा योजना लागू करावी, शालेय पोषण आहारात केळीचा समावेश करावा, हमीभाव मिळावा, भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये केळीचा समावेश करावा, निर्यातीसाठी रशिया हा मोठा पर्याय आहे याबाबत शासनाने निर्णय घ्यावा, दुष्काळासाठी पॅकेज द्यावे आदी मागण्याबाबत चर्चा करण्यासाठी तसेच केळी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सदर परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेमध्ये मध्यप्रदेश अखिल भारतीय बनाना महासंघाचे राज्याध्यक्ष हेमंत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील होणार आहे.
Post Views: 5