बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सव ‘उन्मेष सृजनरंगाचा’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भित्तीचित्रण स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री शिवाजी महाविद्यालयात स्पर्धेसाठी खास निर्मित करण्यात आलेल्या ‘संत तुकाराम ललित कला मंचा’वर विविध कलाप्रकारांत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा आणि कलागुणांचा सुरेख आविष्कार पाहायला मिळाला.
स्पर्धेसाठी विशेष तयारी करून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. भित्तीचित्रण, कातरकाम, व्यंगचित्र, मेहंदी, मातीकाम आणि रांगोळी अशा विविध कलाप्रकारांचा या स्पर्धेत समावेश होता. या विविध स्पर्धांमध्ये वीसपेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आपल्या कलाकौशल्याचे दर्शन घडविले. कातरकाम स्पर्धेसाठी ‘फुलदाणी’ आणि ‘निसर्गचित्र’ हे विषय देण्यात आले होते. तर भित्तीचित्रणासाठी ‘जलसंवर्धन’ आणि ‘अवयवदान’ यांसारखे सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि ज्वलंत विषय देण्यात आले. या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला कलात्मक अभिव्यक्ती देत प्रभावी कलाकृती साकारल्या. विशेषतः सामाजिक प्रश्नांशी निगडित विषयांचे सादरीकरण करताना विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांसोबतच सरावातून विकसित झालेली कलाकुसर पाहायला मिळाली. रंग, रेषा, आकार आणि कल्पकतेचा योग्य वापर करत विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतींमधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळत असून, विविध कला प्रकारांतील त्यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळत असल्याचे या स्पर्धेच्यानिमित्ताने अधोरेखित झाले.
Post Views: 10