सोलापूर : क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत सहस्त्रार्जुन प्रशालेच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले. खेळाडूंनी दाखविलेल्या जिद्द, चिकाटी, शिस्त आणि उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या जोरावर मिळविलेल्या या दैदिप्यमान यशामुळे सहस्त्रार्जुन प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्पर्धेमध्ये सहस्त्रार्जुन प्रशालेच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. सातत्यपूर्ण सराव, योग्य नियोजन आणि मार्गदर्शकांचे मार्गदर्शन यामुळे खेळाडूंनी आपली सर्वोत्तम कामगिरी साकारत संघाला विजेतेपद मिळवून दिले. या विजयी संघाचे नेतृत्व कर्णधार अश्विन ढगे याने केले. त्याच्यासह अथर्व कस्तुरे, युवराज मिस्कीन, प्रथमेश कोळी, समर्थ निचळ, सारीपुत कांबळे, शुभम चव्हाण, विवेक कोळी, बालाजी कोळी, पृथ्वीराज बेळे, सोहम बंडगर व आयान सय्यद यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक डॉ. उज्वल मलजी व राघवेंद्र बीळेभावी यांचे सातत्यपूर्ण व मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या मेहनतीला योग्य दिशा देत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम मार्गदर्शकांनी केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सो. स. क्षत्रिय समाज (विठ्ठल मंदिर) ट्रस्टचे अध्यक्ष संजीवसा बिद्री, सचिव जयकुमारसा कोल्हापुरे, सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजुसा भुमकर, सचिव गजाननसा गोयल यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
सहस्त्रार्जुन प्रशालेचे मुख्याध्यापक मोरेश्वर काटवे , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा माने , इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी बिराजदार यांनीही विजयी खेळाडूंचे कौतुक करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
—-
Post Views: 11