सोलापूर – (विशेष प्रतिनिधी) संगीत, नाट्य आणि अभिनय क्षेत्रात आपल्या अष्टपैलू कर्तृत्वाने प्रदीर्घ काळ रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या सोलापूरच्या सुपुत्री, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री फय्याज शेख यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘गुरुवर्य पद्माकर देव स्मृती गौरव पुरस्कार -२०२६’ प्रदान करण्यात आला. ‘श्रुति-मंदिर’ सोलापूर आयोजित हा भव्य पुरस्कार सोहळा फडकुले सभागृहात पार पडला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते फैय्याज यांना हा गौरव प्रदान करण्यात आला. मानपत्र रोख रक्कम क्षार आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी श्रुती मंदिरचे अध्यक्ष ॲड. जे. जे. कुलकर्णी तर कार्यवाह विद्या काळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्कार प्रदान केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की ”सोलापूरच्या या गुणी आणि सांस्कृतिक मातीने देशाला अनेक महान कलावंत दिले आहेत, त्यापैकीच एक लखलखते रत्न म्हणजे फैय्याज, त्यांनी आपल्या अप्रतिम गायकीने आणि ताकदीच्या अभिनयाने मराठी नाट्य-संगीत सृष्टीत एक सुवर्णकाळ निर्माण केला. आज त्यांना त्यांच्याच जन्मभूमीत आणि गुरुवर्य पद्माकर देव यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार सोहळा पाहणे हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. गुरुवर्य पद्माकर देव हे केवळ एक शिक्षक किंवा संगीततज्ज्ञ नव्हते, तर त्यांनी सोलापुरात संगीत आणि कलेची रोवलेली बीजे आज एका भव्य वृक्षाच्या रूपात उभी आहेत. त्यांनी अनेक पिढ्यांना कलेचे संस्कार दिले. अशा थोर व्यक्तिमत्त्वाच्या नावाने दिलेला हा पुरस्कार स्वीकारताना फैय्याज यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि आनंद खूप काही सांगून जातो. फैय्याज यांनी आपल्या कलासाधनेतून सोलापूरचे नाव संपूर्ण देशभरात उज्ज्वल केले आहे. त्यांचे हे योगदान येणाऱ्या नवीन पिढीतील कलाकारांसाठी कायम प्रेरणादायी राहील.”
”माझ्या जन्मभूमीत झालेला हा सत्कार माझ्या पाठीवरील थाप” —फैय्याज
पुरस्कार स्वीकारल्यानंतर अत्यंत भावूक झालेल्या फय्याज शेख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, ”जगाच्या पाठीवर कुठेही सन्मान मिळाला, तरी आपल्या जन्मभूमीत आणि आपल्या माणसांमध्ये मिळणाऱ्या सत्काराची जागा कोणीच घेऊ शकत नाही. सोलापूर ही माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. गुरुवर्य पद्माकर देव यांच्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत. सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या हस्ते आणि सोलापूरकरांच्या साक्षीने झालेला हा सत्कार माझ्या कलाप्रवासातील सर्वात मोलाचा क्षण आहे. सोलापूरकरांनी मला जे प्रेम दिले, त्याबद्दल मी आयुष्यभर ऋणी राहीन.”
प्रकट मुलाखतीस रसिकांचा उदंड प्रतिसाद!
———————
पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर फैय्याज यांची विशेष प्रकट मुलाखत पार पडली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या बालपणातील आठवणी, सोलापूरशी असलेले जिव्हाळ्याचे नाते, संगीतातील सुरुवातीचे धडे आणि नाट्यसृष्टीतील संस्मरणीय प्रसंगांना उजाळा दिला. त्यांच्या रंजक आणि रसाळ गप्पांनी संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. त्यांनी याप्रसंगी काही गीतेही गायले. रंगकर्मी शिरीष देखणे यांनी ही मुलाखत घेतली.
याप्रसंगी शिवरंजनीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल नितीन दिवाकर, फैयाज यांची मुलाखत घेतल्याबद्दल
शिरीष देखणे, गौरव पत्राचे शब्दांकन केल्याबद्दल नसीम पठाण, संवादिनीवर साथ दिल्याबद्दल ओंकार पाठक, आणि सुंदर हस्ताक्षरात मानपत्र तयार केल्याबद्दल उमेश मोहोळकर या सर्वांचा सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. जे. जे. कुलकर्णी यांनी केले मानपत्राचे वाचन सुहास मार्डीकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.अपूर्वा पंचवाडकर यांनी तर आभार पद्माकर कुलकर्णी यांनी मानले. सुहास मार्डीकर, अमोल धाबळे, श्रीराम झाडे, यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला उद्योजक दत्ता अण्णा सुरवसे माजी आमदार आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, डॉ नसीम पठाण, हि. ने वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, डॉ. श्रीकांत कामतकर, अण्णासाहेब कोतली, वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष फैय्याज शेख, प्रा. अर्जुन व्हटकर, संध्या जोशी, शोभा बोल्ली, गुरु वठारे, दीपक कलढोणे, आशुतोष नाटकर, वैदही अष्टपुत्रे, नगरसेवक चेतन नरोटे यांच्यासह शहरातील संगीत, नाट्य, साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, रसिक प्रेक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
,—————–
Post Views: 7