सोलापूर : सेवकसंच २०२५-२६ नुसार सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळात नव्याने २२ केंद्रप्रमुखांची पदे निर्माण झाली आहेत. यापैकी ११ पदे पदोन्नतीने तर उर्वरित ११ पदे सरळसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत. मात्र सरळसेवेच्या ११ पदांबाबतचे मार्गदर्शन अद्याप वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेले नाही. हे मार्गदर्शन लवकरात लवकर पाठविण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेला दिले.
महानगरपालिका आयुक्तांनी ३० जून २०२६ रोजी याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविले होते. मात्र अद्याप त्यावर निर्णय न झाल्याने केंद्रप्रमुख भरतीची प्रक्रिया रखडली आहे. ११ पदे पदोन्नतीने भरल्यास प्राथमिक शिक्षण मंडळातील प्रशासकीय कामकाज अधिक सुरळीत होण्यास मदत होईल, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेने मांडली.यासंदर्भात संघटनेच्या मनपा सोलापूर शाखेच्या शिष्टमंडळाने शिक्षण संचालक शरद गोसावी आणि शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी केंद्रप्रमुख पदांच्या भरतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाला आवश्यक मार्गदर्शन लवकरात लवकर पाठविण्यात येईल, असे मोरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष नागेश गोसावी, कोषाध्यक्ष संदीप घोळवे, राज्य प्रतिनिधी स्वप्निल चाबुकस्वार आणि संघटक विजयकुमार टेकाळे यांचा समावेश होता.
—-
Post Views: 11