सोलापूर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ च्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतल्यानंतर दि. ३ ऑक्टोबर २०२६पासून नियोजित असलेली राज्यसेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे परीक्षार्थींमध्ये पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला असून, परीक्षा पुढे ढकलण्यास हरकत नसली तरी पुढील सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५च्या मूल्यांकनाबाबत विद्यार्थी आणि विविध संघटनांकडून आयोगाकडे आक्षेप नोंदविण्यात आले होते. हे आक्षेप विचारात घेऊन आयोगाने उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर राज्यातील प्रचलित परीक्षा पद्धतींचा आढावा घेण्यासाठी शासनाने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. ही समिती परीक्षार्थी आणि संबंधित घटकांशी चर्चा करून आदर्श परीक्षा पद्धतीबाबत शिफारशी करणार आहे.
परीक्षा वेळेत न झाल्याने उमेदवारांचे नियोजन कोलमडते. अभ्यासाचे वेळापत्रक, आर्थिक नियोजन आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांची तयारी यावर त्याचा परिणाम होतो. अनेक उमेदवार विविध विभागांच्या परीक्षांसाठी एकाच वेळी तयारी करत असल्याने एका परीक्षेचे वेळापत्रक बदलल्यास त्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण परीक्षा नियोजनावर होत आहे.