सोलापूर – जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती गंभीर होत असताना गावोगावी वाढलेल्या जार प्लांटच्या व्यवसायावर आता प्रशासनाची नजर वळली आहे. परवानग्या न घेता अथवा पाण्याची गुणवत्ता तपासणी न करताच सुरू असलेल्या जार प्लांटची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात अपेक्षित पाऊस न झाल्याने ग्रामीण भागातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत घट झाली आहे. शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर केल्याने टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना सुरुवात झाली आहे. आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याचा फायदा घेत अनेक गावांमध्ये जार प्लांटची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
( जिल्हा परिषद आणि सी ई ओ कुशल जैन यांचा फोटो लावणे)
मात्र, पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या या प्लांटची परवानगी आणि पाण्याची गुणवत्ता याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. काही ठिकाणी बोअरवेलचे पाणी योग्य पद्धतीने शुद्धीकरण न करता विकले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. काही प्लांटमध्ये फिल्टर यंत्रणेऐवजी इतर पद्धतींचा वापर करून पाणी थंड करून विकले जात असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अशा पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात जार प्लांटची तपासणी नेमकी कोणत्या विभागाने करायची, याबाबत गेल्या काही वर्षांपासून संभ्रमाची स्थिती होती. मात्र, आता या मुद्द्यावर प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. परवानगीशिवाय सुरू असलेले तसेच पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी न केलेले प्लांट तपासण्याचे निर्देश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता काटकर यांना देण्यात आले आहेत.
तपासणीत काय पाहिले जाणार?
तपासणीदरम्यान जार प्लांटकडे आवश्यक परवाने आहेत का, पाण्याचा स्रोत कोणता आहे, पाण्याची नियमित गुणवत्ता तपासणी केली जाते का, शुद्धीकरणाची प्रक्रिया योग्य आहे का आणि व्यावसायिक वापरासाठी पाणी सुरक्षित आहे का, याची पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे.
चौकट
तर होऊ शकते कारवाई
पाण्याच्या नमुन्यांमध्ये आरोग्यास घातक घटक आढळल्यास संबंधितांवर नियमांनुसार कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी ‘परवाना आणि गुणवत्ता’ ही दोन्ही बंधने आता महत्त्वाची ठरणार आहेत.
कोट
परवानगी आणि गुणवत्तेची तपासणी महत्त्वाची
जार प्लांट सुरू करताना संबंधित विभागांच्या आवश्यक परवानग्या घेणे अपेक्षित आहे. आरोग्य विभागाची परवानगी तसेच पाणी व गुणवत्ता विभागाकडून पाण्याची तपासणी करून ते पिण्यायोग्य असल्याचा दाखला घेणे आवश्यक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.