सोलापूर – शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सोलापूर जिल्हा परिषदेने शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण केल्याने पुणे विभागात प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सोलापूरने आघाडी घेतली आहे. मात्र, या प्रक्रियेवर एका वकिलाने आक्षेप घेत नोटीस बजावल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना, “वकिलाने घेतलेल्या आक्षेपाच्या एक आठवडा आधीच आम्ही शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण केली होती,” असे स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून नवीन शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. १७ सप्टेंबर रोजी समुपदेशनाद्वारे शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या.
त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे सोलापूरची प्रक्रिया आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सांगली आणि सातारा जिल्ह्यांमधील शिक्षक भरती प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये भरती प्रक्रिया आधीच पूर्ण झाल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, भरती प्रक्रियेवर घेण्यात आलेल्या आक्षेपामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. शिक्षक भरती प्रक्रिया नियोजित वेळेत आणि कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे अभिनंदन केले.