सोलापूर : रेल्वे स्टेशनसमोरील काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनीचा भाग अचानक कोसळल्याने दोन घरांमध्ये १८ जण अडकले. यामध्ये १४ महिला आणि चार पुरुषांचा समावेश होता. तसेच दोन वर्षांची आणि १४ वर्षांची अशा दोन मुलीही होत्या. कुटुंबातील व्यक्तीच्या १४व्या दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी हे सर्वजण एकत्र आले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेत दोन शिड्यांचा ‘ब्रीज’ तयार करून सर्वांची सुखरूप सुटका केली.
महापालिका अग्निशमन दलाला सायंकाळी ४.२३ वाजता घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला. बाल्कनीचा भाग कोसळल्याने नागरिकांसाठी बाहेर पडण्याचा मार्ग धोकादायक झाला होता. त्यामुळे जवानांनी दोन शिड्यांच्या साहाय्याने सुरक्षित मार्ग तयार केला आणि अडकलेल्या नागरिकांना एक-एक करून बाहेर काढले.
सायंकाळी ५.१० वाजता बचावकार्य पूर्ण झाले. अवघ्या ४७ मिनिटांत १८ जणांची सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मुख्य अग्निशमन अधिकारी राकेश साळुंके हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून बचाव मोहिमेवर लक्ष ठेवून होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही रेस्क्यू मोहीम पार पडली.
यावेळी प्र. केंद्र अधिकारी श्रीकांत भडके, गौतम आव्हाड, रावसाहेब सलगर तसेच फायरमन पुष्कराज घुमे, स्वप्नील कांबळे, कल्याण धप्पाधुळे, शुभम मिरगुंडे, पंकज माळी, करण रजपूत आदी अग्निशमन दलाचे जवान या मोहिमेत सहभागी झाले.
—
Post Views: 8