मोहोळ – आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन, महाराष्ट्र आयोजित ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२६’ हा मानाचा पुरस्कार तालुक्यातील औंढे येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अर्चना पांडुरंग बचुटे यांना शिक्षण व समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला प्रोत्साहन देणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करणे तसेच सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांना पाठबळ देणे, या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला. समाजसेवेच्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत विविध घटकांसाठी मदतीचा हात पुढे करणे आणि समाजहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान प्राप्त झाला.
त्यांना मिळालेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार त्यांनी त्यांचे पती स्व. पांडुरंग बचुटे यांना समर्पित केला.
पतींच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी अत्यंत मोठी होती. मात्र मनातील असंख्य दुःख न दाखवता त्यांनी घर, मुलं आणि संस्थेची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. दुःखाच्या या प्रसंगी पहाडासारख्या खंबीरपणे उभ्या राहून आपले कार्य अविरत सुरू ठेवले. त्यांच्या कार्याचा झालेला हा गौरव म्हणजे कर्तृत्वाची आणि जिद्दीची एक महत्त्वपूर्ण पावतीच आहे.
हा मानाचा सन्मान प्राप्त करून त्यांनी औंढी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे आणि त्यांचे हे यश संपूर्ण गावासाठी, शिक्षण क्षेत्रासाठी आणि समाजासाठी अभिमानास्पद व प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी परिसरातून व्यक्त करण्यात येत आहे.
Post Views: 9