बार्शी – कुणी काड्या, कागद, दोर, बाटल्या, लोखंडाचे तुकडे आणि इतर टाकाऊ साहित्य हातात घेतले. कुणी त्यातून निसर्गाचे बदलते रुप उभे केले, तर कुणी दुष्काळाने करपलेली शेती आणि त्यामागची शेतकऱ्यांची वेदना कलाकृतीतून मांडली. कुठे मोबाईलच्या आहारी गेलेल्या जीवनाचे चित्र उमटले, तर कुठे अंतराळाच्या दिशेने झेपावणाऱ्या विज्ञानाची कहाणी आकाराला आली. टाकाऊ वस्तूंना कल्पकतेची जोड देत विद्यार्थ्यांनी ‘टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ विचार’ साकारले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उन्मेष सुजन रंगांचा या युवा महोत्सवातील ‘निर्मिती चित्र’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केवळ कलाकृती साकारल्या नाहीत, तर त्यांच्या माध्यमातून समाजासमोरील अनेक प्रश्नांवर भाष्य केले. उपलब्ध परिसरातील साहित्यालाच कलासाधन मानून त्यातून दिलेल्या विषयाचा स्वतंत्र अर्थ लावत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला आकार दिला.
स्पर्धेसाठी विज्ञान, दुष्काळ आणि तंत्रज्ञान असे तीन विषय देण्यात आले होते. २६ महाविद्यालयीन संघांनी सहभाग घेत विविध संकल्पना प्रभावीपणे मांडल्या. दुष्काळाच्या विषयातून वृक्षतोड, बदलते निसर्गचक्र, पाणीटंचाई, शेतीची बिकट अवस्था आणि शेतकरी आत्महत्येसारखे संवेदनशील प्रश्न ठळकपणे समोर आले.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम विद्यार्थ्यांनी मांडला. विज्ञान विषयात इस्रोच्या अंतराळ प्रक्षेपणासह विज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे चित्रण करण्यात आले.
यासोबतच संस्कृती, शिक्षण, कला, स्त्री सन्मान, बलात्कार, रोजगार हमी, प्रदूषण, भ्रष्टाचार, वृक्षतोड आणि असुरक्षितता अशा विविध सामाजिक विषयांनाही विद्यार्थ्यांनी कलाकृतींच्या माध्यमातून आवाज दिला. त्यामुळे निर्मिती चित्र स्पर्धा ही केवळ कलात्मक अभिव्यक्ती न राहता विद्यार्थ्यांच्या नजरेतून वर्तमान समाजाचे चित्र दाखवणारे व्यासपीठ ठरली.
स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला आणि कलात्मक अभिव्यक्तीला व्यासपीठ देणे हा होता. रंग, रेषा आणि आकारांसोबतच उपलब्ध टाकाऊ साहित्याचा अभिनव वापर करून स्वतंत्र कलाभाषा निर्माण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
या स्पर्धेसाठी चित्रकार दिग्विजय कुंभार, चित्रकार प्रिया डांबर आणि चित्रकार शिरीष आंबेडकर यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले.