सोलापूर : स्टुडिओ सनराईजचे मालक, सोलापुरातील परिचित व्यक्तिमत्त्व संजय नागेश सुरवसे (वय ५९) यांचे सोमवारी (५ ऑक्टोबर २०२६) सकाळी ६ वाजता राहत्या घरी झोपेत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने मित्र परिवार, छायाचित्रकार मंडळी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
संजय सुरवसे हे सोलापुरातील प्रसिद्ध चित्रकार स्व. नागेश सुरवसे यांचे ज्येष्ठ सुपुत्र होते. मनोरमा बँक परिवाराचे उपाध्यक्ष संतोष सुरवसे यांचे ते ज्येष्ठ बंधू, तर स्व. राजेश विष्णुपंत कोठे यांचे ते जीवलग स्नेही होते. गीत आणि संगीत क्षेत्राची त्यांना विशेष आवड होती. हिंदी व मराठी चित्रपटांतील हजारो जुन्या गाण्यांचा त्यांचा दांडगा संग्रह त्यांच्या स्मरणात होता. अनेक गाणी त्यांना मुखोद्गत होती. त्यांच्या संगीतप्रेमामुळे मित्र परिवारात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे. अंत्ययात्रा सोमवारी सायंकाळी ५ वाजता अनुविश्व हाऊसिंग सोसायटी, इंदिरानगर, विजापूर रोड, सोलापूर येथील राहत्या घरापासून निघाली.
मोदी स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, मनोरमा परिवाराचे संस्थापक श्रीकांत मोरे यांच्यासह मित्र परिवार, छायाचित्रकार मंडळी, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संजय सुरवसे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.




















