सोलापूर – दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांना दिवाळीपूर्वी तातडीने आर्थिक मदत द्यावी, अन्यथा दिवाळीत मंत्र्यांनाही दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोमवारी हॉटेल सिटी पार्क येथे झालेल्या पत्रकार परिषदेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी हा इशारा दिला. दुष्काळी उपाययोजनांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना १७ प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात जाहीर केलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी तसेच दुष्काळग्रस्त कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळण्यासाठी आर्थिक मदतीसह विविध सवलती लागू करण्याची मागणी पक्षाने केली आहे.
दुष्काळग्रस्त भागातील संपूर्ण जमीन महसूल माफ करावा, शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी घेतलेली बँक व पतसंस्थांची कर्जे तसेच महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे, शेतीपंपांचे वीजबिल माफ करावे, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क, वसतिगृह व मेसची फी माफ करण्याची मागणीही करण्यात आली.
रोजगार हमी योजनेचे निकष शिथिल करून मागणी होताच तीन किलोमीटरच्या परिसरात कामे उपलब्ध करून द्यावीत. पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी टँकर मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपये, तर शेतमजुरांना २५ हजार रुपये आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करावी. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना दरमहा २५ किलो धान्य मोफत देण्याची मागणी करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी विधानमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, शहराध्यक्ष महेश गादेकर, रविंद्र पाटील, संजय क्षीरसागर, सुनीता रोटे, सौदागर जाधव, प्रशांत बाबर, चंद्रकांत पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कोट १
“दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हातात दिवाळीपूर्वी मदत पोहोचली पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही, तर आम्ही हा प्रश्न रस्त्यावर आणू. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार असेल तर मंत्र्यांनाही दिवाळी साजरी करू देणार नाही,” असा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला.
चौकट १
उजनीतील प्रस्तावित प्रकल्पांवरही प्रश्नचिन्ह
उजनी जलाशय परिसरात प्रस्तावित विविध प्रकल्पांच्या पर्यावरणीय परिणामांचा एकत्रित अभ्यास करण्यात आला आहे का, याची सविस्तर माहिती शासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही खासदार मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
चौकट २
संभाव्य परिणामांचा एकत्रित अभ्यास गरजेचा
उजनी परिसरातील प्रस्तावित एआय कॅम्पस, डेटा सेंटर, फ्लोटिंग सोलर, आण्विक रिॲक्टर, ग्रीन हायड्रोजन आणि लघु मॉड्युलर अणुभट्टी या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले. या प्रकल्पांचा उजनी जलाशय, पाण्याची उपलब्धता, जलचर पर्यावरण, जैवविविधता, स्थानिक शेती आणि नागरिकांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा एकत्रित अभ्यास झाला आहे का, याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली.
Post Views: 11