सोलापूर – गेल्या अनेक वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीच्या सातव्या टप्प्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. शिक्षक सहकार संघटनेने यासंदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले असून, केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाला आंतरजिल्हा बदलीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना यासंदर्भात अधिकृत पत्र पाठवले आहे. त्यामुळे आता शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी दिली.
शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने ११ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षक व महिला शिक्षिकांनी आपल्या कुटुंबीयांसह थेट मुंडन आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान संघटनेच्या शिष्टमंडळाने आमदार फुके व आमदार रहांगडाले यांच्या मध्यस्थीने ग्रामविकास मंत्री व शिक्षण मंत्री यांची भेट घेतली होती.
त्यावेळी जनगणना आणि ‘एसआर’च्या कामांमुळे केंद्र शासनाने बदल्या न करण्याचे निर्देश दिल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, संघटनेच्या आग्रही विनंतीनंतर राज्य सरकारने याबाबत केंद्राकडून मार्गदर्शन मागवण्याचे व सकारात्मक उत्तर आल्यास सातवा टप्पा राबवण्याचे आश्वासन दिले होते.
( टीप सोलापूर जिल्हा परिषद फोटो लोगो लावणे विनंती )
चौकट
हजारो ई-मेल्स अन् प्रत्यक्ष पाठपुरावा
मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचा पाठपुरावा करत शिक्षक सहकार संघटनेने केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय व शिक्षण मंत्रालयाकडे हजारो ई-मेल्स पाठवले. तसेच गृह विभागाच्या सचिवांची दोन वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत केंद्र सरकारने आता राज्य शासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत.
चौकट
जिल्हांतर्गत बदल्यांपूर्वी सातवा टप्पा राबवून न्याय द्यावा!
“शिक्षण मंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाची तात्काळ पूर्तता केल्यास महाराष्ट्रातील बदल्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शिक्षक बांधवांना मोठा न्याय मिळणार आहे. केंद्र सरकारने आमच्या निवेदनाची दखल घेतली आहे; आता राज्य शासनाने जिल्हांतर्गत बदल्यांपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा राबवून बदलीग्रस्त शिक्षकांना त्वरित दिलासा द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी केली आहे.