सोलापूर : महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय यशवंत पाध्ये यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा हा पुरस्कार सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक संचारचे उपसंपादक विक्रम खेलबुडे यांच्यासह राज्यातील नऊ जेष्ठ पत्रकारांना जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा विविध विभागांतून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातून दैनिक लोकमतचे नंदकिशोर पाटील, अमरावती विभागातून दैनिक हिंदुस्थानचे विलास मराठे, कोल्हापूर विभागातून दैनिक सकाळचे निखिल पंडितराव, ठाणे-पालघर विभागातून दैनिक पुण्यनगरीचे सुनील जावडेकर, शिर्डी-अहिल्यानगर विभागातून दैनिक सकाळचे सतीश वैजापूरकर, नांदेड विभागातून दैनिक पुढारीचे संजीव कुलकर्णी आणि जळगाव विभागातून दैनिक लोकशाहीचे डी. जे. गुरव यांचा समावेश आहे.
दैनिक प्रहारचे संपादक पद्मभूषण देशपांडे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून हजारो रुग्णांसाठी मदतीचा हात ठरलेले पत्रकार मंगेश चिवटे यांनाही यावेळी विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे वितरण लवकरच राज्यातील विविध विभागांत मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रोख रक्कम, गौरवचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या राज्यस्तरीय पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेसाठी महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे, सचिव एकनाथ बिरवटकर, कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, उपाध्यक्ष सुधीर जाधव, सदस्य गजानन चव्हाण, खजिनदार दीपाताई पाध्ये यांच्यासह गोरख तावरे, अरुण सुरवाडकर, धोंडूपंत विष्णुपुरीकर, राजेंद्र मोहिते आणि अन्य सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे विक्रम खेलबुडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकारिता क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
——
Post Views: 39