बार्शी – बार्शी शहरात ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव साजरा होत असून, हा उत्सव शांततेत, उत्साहात आणि कायदा-सुव्यवस्था राखून साजरा करावा, असे आवाहन बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी केले आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवातही ‘नो डीजे, नो डॉल्बी’ नियमाची अंमलबजावणी केली जाणार असून लेझरचा वापरही टाळण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
नवरात्रोत्सवासाठी शहरातील सार्वजनिक तसेच वैयक्तिक मंडळांनी आवश्यक ऑनलाइन परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी मंडप व स्टेज उभारताना वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मंडप उभारणीसाठी संबंधित प्रशासन व पोलीस विभागाची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे.
उत्सवाच्या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने देवीच्या मूर्तीच्या ठिकाणी २४ तास स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, अशा सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असेही पोलिसांनी सांगितले.
नवरात्रोत्सवातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर महिला व नागरिकांची गर्दी होत असल्याने गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवातील मिरवणुका काढण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मिरवणुका पारंपरिक मागनिच काढाव्यात. परवानगीशिवाय नवीन मार्गाचा वापर करु नये, अशा सूचना दिल्या आहेत. बार्शीकरांनी यापूर्वीचा
गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करुन प्रशासनाला सहकार्य केले. त्याच पद्धतीने नवरात्रोत्सवातही कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, याची सर्व मंडळे व नागरिकांनी काळजी घ्यावी. जातीय सलोखा आणि सामाजिक शांतता कायम ठेवून नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन बार्शी शहर पोलीस व सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Post Views: 13