यंदा सोलापूर जिल्हा आणि संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना उत्सवातील डामडौल टाळून सामाजिक उत्तरदायित्व जपणे गरजेचे आहे. साधेपणा, गरजू शेतकरी-कष्टकऱ्यांना मदत आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करून स्त्रीशक्तीला खऱ्या अर्थाने आर्थिक व सामाजिक बळ देणे हीच खरी ‘देवीची पूजा’ ठरले, असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री तसेच विद्यमान आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या पत्नी सौ. स्मिता सुभाष देशमुख यांनी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दैनिक तरुण भारतशी बोलताना व्यक्त केले.
त्या पुढे म्हणाल्या की, नवरात्रोत्सव हा केवळ नऊ दिवसांचा धार्मिक उत्सव किंवा पारंपारिक भक्तीचा सण राहिलेला नसून, तो पराक्रम, धैर्य, स्त्री-शक्तीचा जागर करणारा आणि सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनणारा एक भव्य उत्सव झाला आहे. पूर्वी हा सण कौटुंबिक भक्ती आणि घटस्थापनेपुरता मर्यादित होता, परंतु आज त्याला व्यापक सामाजिक स्वरूप प्राप्त झाले आहे. साड्यांच्या नऊ रंगांपेक्षाही मनातील सकारात्मकता, संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी या खऱ्या ‘नवरंगां’चा अंगीकार करणे काळाची गरज आहे.
सौ. स्मिता देशमुख यांनी महिला सक्षमीकरणावर अत्यंत मार्मिक विचार व्यक्त केले. त्यांच्या मते:
* बचत गटांचे उद्योगात रूपांतर: ग्रामीण महिलांकडे अथांग कौशल्य आणि कष्ट करण्याची तयारी आहे. महिलांनी केवळ ‘बचत’ करणाऱ्या न राहता डाळी-धान्य प्रक्रिया, पौष्टिक पदार्थ, शिवणकाम, दुग्धव्यवसाय व शेळीपालन यांद्वारे ‘उत्पन्न निर्माण करणाऱ्या उद्योजिका’ झाले पाहिजे.
* बाजारपेठ आणि डिजिटल प्लॅटफॉर्म: महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य भाव, नियमित ग्राहक, प्रदर्शन आणि डिजिटल माध्यमांद्वारे थेट बाजारपेठ मिळवून देणे हेच खरे सक्षमीकरण आहे. दुष्काळात शेतीचे उत्पन्न घटल्यास बचत गटांना पर्यायी रोजगाराची जोड देणे आवश्यक आहे.
* महिला शिक्षिकांचे योगदान: महिला शिक्षिका या केवळ पुस्तकी ज्ञान न देता भावी पिढीमध्ये दुष्काळ व पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता निर्माण करतात. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्या ‘दुर्गेचे’ प्रत्यक्ष रूप म्हणून कार्य करतात.
“प्रत्येक महिलेच्या मनात एक ‘दुर्गाशक्ती’ दडलेली असते. त्या शक्तीला योग्य संधी, शिक्षण, कौशल्य आणि कौटुंबिक पाठिंबा मिळाला, तर ती स्वतःचे आणि संपूर्ण कुटुंबाचे भविष्य बदलू शकते. महिलांनी स्व-क्षमतेवर विश्वास ठेवून नवीन तंत्रज्ञान शिकावे व एकमेकींना आधार द्यावा,” असा संदेश त्यांनी या प्रसंगी दिला.
Post Views: 18