सोलापूर – जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या नोंदी आणि जुन्या कागदपत्रांचे जतन करण्यासाठी रेकॉर्ड स्कॅनिंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सर्वसाधारण सभेत सदस्य पृथ्वीराज माने यांनी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागविली आहे. मात्र, रेकॉर्ड स्कॅनिंगच्या प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नसल्याने या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदवह्या, जन्मतारीख व शैक्षणिक नोंदी, शाळा सोडल्याचे दाखले आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे अनेक वर्षांपासून कागदी स्वरूपात जतन केली जातात. कालांतराने ही कागदपत्रे जीर्ण होणे, फाटणे किंवा खराब होण्याचा धोका वाढतो. विशेषतः जात प्रमाणपत्र पडताळणीसारख्या प्रक्रियांमध्ये जुन्या शैक्षणिक नोंदींची आवश्यकता भासते. अशा वेळी मूळ कागदपत्रे उपलब्ध नसल्यास विद्यार्थी आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मराठा आरक्षणासह विविध सामाजिक आणि शैक्षणिक मागण्यांच्या पार्श्वभूमीवर जुन्या शालेय नोंदींचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे या नोंदींचे डिजिटल स्वरूपात जतन करणे ही केवळ प्रशासकीय गरज नसून भविष्यातील संदर्भासाठी आवश्यक बाब आहे. रेकॉर्ड स्कॅनिंग झाल्यास कागदपत्रे खराब होण्याचा धोका कमी होईल. तसेच गरजेच्या वेळी संबंधित नोंदी शोधणे आणि उपलब्ध करून देणेही सोपे होणार आहे.
चौकट
अहवाल मागविला; खर्चाचा अंदाज बाकी
सदस्य पृथ्वीराज माने यांनी सर्वसाधारण सभेत हा मुद्दा मांडल्यानंतर सीईओ कुशल जैन यांनी गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना शाळांमधील उपलब्ध रेकॉर्डची माहिती व अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्कॅनिंगसाठी किती कागदपत्रे उपलब्ध आहेत आणि संपूर्ण प्रक्रियेसाठी किती खर्च अपेक्षित आहे, याचीही चाचपणी करण्यात येत आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कामाची व्याप्ती, कार्यपद्धती आणि खर्चाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, या प्रक्रियेची कालमर्यादा अद्याप निश्चित झालेली नाही. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असली, तरी प्रत्यक्ष कामासाठी निधीची तरतूद, नियोजन आणि अंमलबजावणीचा ठोस कार्यक्रम जाहीर होणे आवश्यक आहे.
चौकट
केवळ अहवाल नव्हे, प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा
जिल्हा परिषद प्रशासनाने रेकॉर्ड स्कॅनिंगसाठी माहिती संकलन आणि खर्चाचा अंदाज घेण्यापलीकडे जाऊन ठोस कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे. तालुकानिहाय शाळांमधील रेकॉर्डचे सर्वेक्षण, अत्यंत जुनी व नाजूक कागदपत्रे प्राधान्याने स्कॅन करणे, डिजिटल नोंदींच्या सुरक्षिततेची व्यवस्था आणि आवश्यक निधीची तरतूद या बाबी नियोजनात समाविष्ट करणे अपेक्षित आहे.
कोट
गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडून रेकॉर्डची माहिती मागविण्यात आली आहे. स्कॅनिंगसाठी लागणारा खर्च आणि कागदपत्रांची संख्या याबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. नागरिकांच्या महत्त्वाच्या नोंदी योग्य पद्धतीने जतन करण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे.
– कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
Post Views: 13