सोलापूर : प्रा. माधव कुलकर्णी यांनी आपल्या पहिल्याच पुस्तकातुन विविध विषय व्यक्तीमत्व यांचा घेतलेला धांडोळा म्हणजे साहित्यिक मेजवानीच आहे. पुस्तकाची व्याप्ती वाचकांना तृप्त करणारी ठरेल, असे मत अध्यक्ष स्थानावरुन समीक्षक प्रा.डॉ. राजशेखर शिंदे यांनी मांडले.
या प्रसंगी व्यासपीठावर पुस्तकाचे लेखक प्रा. माधवराव कुलकर्णी,ज्येष्ठ साहित्यिका दिपाली दातार, ज्येष्ठकवी देवेंद्र औटी, कवयित्री मानसी चिटणीस उपस्थित होते. दयानंद महाविद्यालयाचे मराठी भाषेचे निवृत्त प्राध्यापक विचारवंत प्रा. डॉ. माधवराव कुलकर्णी यांच्या ‘वाड्मयीन विलसिते’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यातील पत्रकार भवन येथे संपन्न झाला. समीक्षकांच्या एकूणच सर्व निकषांच्या फूटपट्टी(स्केल) वर पुरेपूर खरा उतरलेला साहित्यिक दस्तऐवज “वाड्मयीन विलसिते” चा संदर्भ ग्रंथ म्हणुन पुढील काळात उपयोग होईल असे मत ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिका दीपाली दातार यांनी मांडले.
एका व्यापक व्यासंगी व अनुभवसिद्ध मराठी भाषेच्या गुरूजींचा सूक्ष्म अध्ययन व अभ्यासाचा वैचारिक परिपाक म्हणून वाचक, रसिक या साहित्यकृतीकडे गांभीर्याने पाहतील की ज्यात सोलापूरी मातीतील अवकाश गवसेल. असे मत या ‘पुस्तकाचे ब्लर्ब लेखक’
कविवर्य देवेंद्र औटी यांनी मांडले.
सूत्रसंचालन सोलापूर आकाशवाणीचे निवेदक अभिराम सराफ यांनी अतिशय खुमासदार काव्यात्मकतेने केले. यावेळी पुणे, सोलापूर, अक्कलकोट येथील विविध क्षेत्रांतील रसिकांची उपस्थिती होती.