पंढरपूर – लायन्स क्लब पंढरपूर यांच्या अंधविकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेतील दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांनी यंदाही आपल्या कलागुणांचा सुंदर आविष्कार घडवत विविध प्रकारच्या आकर्षक मेणपणत्या व मेणबत्त्या तयार केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या कलाकृती दिवाळीच्या सजावटीसह हॉटेल, रेस्टॉरंट, कॅण्डललाइट डिनर आणि विविध व्यावसायिक उपयोगांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी मेहनत, कल्पकता आणि कौशल्याच्या जोरावर विविध आकारांच्या मेणपणत्या बनवल्या आहेत. यामध्ये डोअर शेप, हार्ट शेप, टेडी शेप, बटरफ्लाय शेप, रोझ शेप, हार्ट कॅण्डल, डबी कॅण्डल, राऊंड कॅण्डल डबी आणि कपल कॅण्डल अशा विविध प्रकारच्या आकर्षक मेणबत्त्यांचा समावेश आहे. दहा मेणपणत्यांच्या एका पाकिटाचे स्वागत मूल्य ५० रुपये ठेवण्यात आले असून, इतर प्रकारांच्या किमती त्यांच्या आकारानुसार व प्रकारानुसार वेगवेगळ्या आहेत.
दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण मिळावे आणि त्यांनी भविष्यात स्वावलंबी व्हावे, या उद्देशाने शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या या वस्तूंची खरेदी केल्यास त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच त्यांच्या आत्मविश्वासातही वाढ होणार आहे.
या उपक्रमासाठी शाळेच्या कला शिक्षीका अश्विनी माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून त्यांना विशेष शिक्षक महेश म्हेत्रे, उमा कुलकर्णी, रोहिणी घोडके, साधना गिरी आणि इतर कर्मचाऱ्यांनी देखील मोलाचे सहकार्य केले आहे.
संस्थेचे अध्यक्ष मुन्नागिर गोसावी यांनी नागरिक, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मेणपणत्या व मेणबत्त्या खरेदी करून त्यांच्या व्यावसायिक प्रशिक्षणाला हातभार लावावा आणि स्वावलंबनाच्या दिशेने सुरू असलेल्या त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यावे, असे देखील आवाहन त्यांनी केले.
—————————
चौकट : ( खरेदीसाठी यांच्याशी करा संपर्क )
मेणपणत्या व मेणबत्त्या खरेदीसाठी प्रभारी मुख्याध्यापक संतोष बारहाते (मो. ९९२२९३८५८६), अनिल कुंभार (मो. ९९२२५२८८८४) आणि सुनील व्यवहारे (मो. ७०२०६५८९२२) यांच्याशी संपर्क साधावा, असे शाळेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Post Views: 11