सोलापूर – बीड येथील वाल्मीक कराड याचा मुलगा सुशील कराड व त्याचे दोन साथीदार अनिल मुंडे व गोपी गंजेवार (सर्व रा. परळी, जि. बीड) यांच्यावर खुनाचा प्रयत्न, पोक्सोसह इतर गंभीर कलमांन्वये येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी महिलेचा पती हा सुशील कराड याच्याकडे मार्केटिंग मॅनेजर व कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून कामास होता. या दरम्यान फिर्यादी महिला ही दोन बल्कर, दोन कार या १०० टक्के कर्जावर घेऊन ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करीत होती. तसेच तिने परळी वैजनाथ येथे एक प्लॉट देखील घेतला होता. सुशील कराड याने तिच्या पतीस तू एवढे कसे काय कमावला, तू ट्रक धंदा बंद कर, असे म्हणून मारहाण केली होती. ६ मे २०२४ रोजी फिर्यादीच्या पतीस ऑफिसमध्ये डांबून ठेवून रिव्हॉलव्हर लावून मारहाण केली होती व गाडीच्या चाव्या तसेच कागदपत्रे काढून घेतली आणि रात्री अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या पतीला घरी आणून सोडले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सात मे रोजी सुशील कराड व त्याच्या दोन साथीदारांनी फिर्यादीच्या घरात घुसून लहान मुलांसह सर्वांना धाक दाखवून जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली व त्यांच्या नावे असलेला प्लॉट हा दुसऱ्याच्या नावे खरेदी करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांचे सोने हे सराफ्यास विकण्यास भाग पाडले व आलेली रक्कम ही सुशील कराड याने घेतली. तसेच त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यामुळे महिला व तिचे कुटुंब सोलापूर येथे आले.
यादरम्यान यातील आरोपी गोपी गंजेवार व इतर पाच ते सहा लोक हे सोलापूर येथे महिला राहत होती तिथे येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेने पोलीस आयुक्त सोलापूर, पोलीस अधीक्षक बीड, एमआयडीसी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती. परंतु ही तक्रार पोलिसांनी घेतली नाही. त्यावर महिलेने ॲड. विनोद सूर्यवंशी यांच्यामार्फत येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अर्ज योग्य त्या न्यायालयाच्या स्थळ सीमेत दाखल करण्याचे आदेश दिले. महिलेने सदर आदेशाविरुद्ध ॲड. रितेश थोबडे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दरम्यान अर्जाच्या सुनावणीपूर्वी पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात १४ गंभीर गुन्ह्याखाली झिरो नंबरने गुन्हा नोंद केला व तो परळी येथे वर्ग केला आहे.



















