अकलूज – माळशिरस तालुका रास्त भाव धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने तालुक्यात नव्याने रुजू झालेले पुरवठा निरीक्षक अधिकारी श्री. ओंकार आसबे आणि श्री. किरण गुंड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून ते तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.
महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ धान्य दुकानदार महादेव तरंगे, सुभाष शिकारी, नजीर मुलाणी, रघुनाथ कदम, मधुकर कुलकर्णी, ज्ञानेश्वर डोंगरे, उत्तम कर्णवर, विठ्ठल अर्जुन, सुरेश पांढरे, लाला पाटोळे, बाळासाहेब आवटे आणि माऊली नलवडे यांच्या हस्ते नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीत धान्य दुकानदारांच्या विविध अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. दुकानदारांचे प्रलंबित कमिशन तातडीने अदा करावे, गोरगरीब व मजूर कुटुंबांची डिलीट झालेली रेशनकार्ड पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच तालुक्यात वितरित होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या तांदळाऐवजी चांगल्या प्रतीचा तांदूळ उपलब्ध करून द्यावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सर्व समस्यांची नोंद नवनियुक्त पुरवठा निरीक्षक ओंकार आसबे आणि किरण गुंड यांनी घेतली. या समस्या पुढील बैठकीत वरिष्ठ कार्यालयाच्या निदर्शनास आणून देऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
नवीन अधिकारी रुजू होऊन अल्पावधी झाला असतानाही त्यांनी धान्य दुकानदारांच्या समस्या मनापासून ऐकून घेतल्या आणि समाधानकारक प्रतिसाद दिला. अधिकाऱ्यांची काम करण्याची सकारात्मक भूमिका पाहून समाधान वाटल्याची भावना जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समीर चोरटे यांनी केले. यावेळी हरीभाऊ जगताप, मिलिंद रेडेकर, विक्रम शिंदे, कोकरे, जावेद सय्यद, शहाजी मगर, पोपट निंबाळकर, विनोद थोरात, बाळासाहेब भिसे, संजय कोपणार, संजय खराडे, मुकुंद गुजरे, शिवाजी लोखंडे, नवनाथ कदम, अक्षय मिले यांच्यासह माळशिरस तालुक्यातील सुमारे ७० ते ७२ रास्त भाव धान्य दुकानदार उपस्थित होते.
Post Views: 12