सोलापूर – थोर पर्यावरणवादी, निसर्गअभ्यासक, साहित्यिक आणि ‘अरण्यऋषी’ म्हणून सर्वत्र परिचित असलेले पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांनी आपले संपूर्ण आयुष्य निसर्गाच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी, त्याच्या सखोल अभ्यासासाठी आणि निसर्गसंपदेच्या संवर्धनासाठी समर्पित केले. त्यांच्या अथक परिश्रमांतून, अखंड ध्यासातून आणि निरंतर भटकंतीतून साकारलेले प्रयोग, मौलिक नोंदी, विपुल साहित्य तसेच विविध भाषांतील आणि जगभरातील दुर्मिळ ग्रंथ हा समाजासाठी अमूल्य ठेवा आहे. या प्रेरणादायी कार्याचे औचित्य साधून अरण्यऋषी पद्मश्री स्व. मारुती चित्तमपल्ली यांचे चाहते, निसर्गप्रेमी, अभ्यासक आणि हितचिंतक यांच्या पुढाकारातून ५ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली संदर्भ ग्रंथालय’ केंद्राचा उद्घाटन सोहळा आणि वेबसाइटचे लोकार्पण आयोजित करण्यात आले आहे.
या समृद्ध वारशाचे जतन व्हावे, नव्या पिढीला निसर्गाचा सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा मिळावी आणि भावी संशोधकांना पर्यावरणविषयक संदर्भसाहित्य सहज उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने सोलापुरात ‘अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली संदर्भ ग्रंथालय’ या ज्ञानकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, अरण्यऋषींनी आपल्या हयातीतच या संदर्भ ग्रंथालयाची संकल्पना मांडली होती. नव्या पिढीतील विद्यार्थी, अभ्यासक आणि संशोधकांना उपयुक्त ठरेल, तसेच भविष्यातील संशोधनासाठी मार्गदर्शक ठरेल, असे ज्ञानकेंद्र निर्माण व्हावे, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. निसर्गाशी मैत्री करू पाहणाऱ्या आणि मानवी जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी ज्ञानसाधना करणाऱ्या भावी पिढ्यांना आपला हा ज्ञानवारसा उपलब्ध करून देण्याची त्यांची धडपड होती.
वाढत्या वयामुळे आपल्या या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या कुटुंबीयांवर, विशेषतः पुतणे श्रीनिवास चित्तमपल्ली आणि श्रीकांत चित्तमपल्ली यांच्यावर सोपविली होती. त्यांनीही अरण्यऋषींच्या या संकल्पनेप्रति निष्ठा आणि श्रद्धा जपत ती प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.






















