बार्शी – नॅशनल फार्मसी सप्ताह व नॅशनल फार्मसी दिनाच्या निमित्ताने फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया निर्देशानुसार व नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन यांच्या सहकार्याने कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, तळेगाव दाभाडे, पुणे येथे आयोजित विशेष कार्यक्रमात विविध राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे स्वस्थ भारत: कॉमबॅटिंग अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स या थीम वरती आयोजन करण्यात आले होते. सोजर कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी रील मेकिंग, पोस्टर प्रेझेंटेशन, साईटून, लीफलेट, नुक्कड नाटक, प्रश्नमंजुषा या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये प्रामुख्याने प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष बी. फार्मसीच्या कु. प्राची खैरे, कु. माहेविश तांबोळी आणि कु. सानिया बाबुडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. महाराष्ट्रातील विविध फार्मसी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत तिन्ही विद्यार्थिनींनी विषयज्ञान, अचूक उत्तरे, आत्मविश्वास आणि सांघिक समन्वयाच्या जोरावर हे उल्लेखनीय यश संपादन केले. सदर स्पर्धेकरता पीसीआय नोडल ऑफिसर म्हणून प्रा. मनीषा लवटे व राष्ट्रीय कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. डॉ. शिवाजी पाटील, प्रा. स्नेहा काळे, प्रा. डॉ. स्वप्निल पोळ यांनी प्रा. डॉ. सुजित करपे व प्रा. शशिकांत मोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेतले.
या यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री अरुणदादा बारबोले व सचिवा सौ. कल्पनाताई बारबोले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनी, प्राचार्य, प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, संशोधन व नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच फार्मसी व्यवसायाची सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले हे विविध उपक्रम आणि विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्तरावर मिळविलेले यश महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि सामूहिक प्रयत्नांची साक्ष देणारे ठरले.
महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व सहभागी विद्यार्थी, विजेत्या विद्यार्थिनी, प्राध्यापक आणि आयोजन समितीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
Views: 12