भीमा नदी कोरडी पडल्याने या नदीवरून असणाऱ्या प्रादेशिक व स्थानिक नळ पाणीपुरवठा योजना पूर्णपणे कोलमडल्या आहेत. मंद्रूप, बरूर, नांदणी, कुरघोट, टाकळी, बाळगी , माळकवठ , चिंचपूर हत्तरसंग, कुडल, औज, कारकल, सादेपूर आणि लवंगी या गावांमधील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. उजनीचे पाणी सुटल्याची बातमी ऐकून नागरिकांना दिलासा मिळाला होता, मात्र पाणी वेळेत न पोहोचल्याने आता प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
उजनीचे पाणी भंडारकवठे आणि परिसरापर्यंत येऊन पोहोचले आहे, मात्र प्रशासकीय नियोजनाचा अभाव आणि पाणी पुढे सरकण्याची संथ गती यामुळे मंद्रूपसह पुढील गावांतील शेतकरी पाण्यापासून पूर्णपणे वंचित राहिले आहेत. डोळ्यांदेखत पिके जळत असताना आणि पाणी काही अंतरावर असतानाही ते शेतापर्यंत न आल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.
या भीषण पाणीटंचाईत महावितरणच्या कारभारामुळे आगीत तेल ओतले गेले आहे. सध्या शेतीसाठी केवळ दोन तास वीज पुरवठा केला जात आहे. पाणी जवळ आले तरी या दोन तासांच्या अल्प कालावधीत पिकांना पाणी देणे अशक्य आहे. नदीला पाणी नसणे आणि त्यातच विजेची ही बिकट अवस्था, यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे पार मोडले आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि पिके जळण्याची भीती यामुळे या ११ गावांतील नागरिक आणि शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने तात्काळ उजनीचे पाणी मंद्रूप, बरूर, हत्तरसंग , नांदणी,लवंगी, सादेपूर , कुरघोट, टाकळी, , कुडल, औज, कारकल, बाळगी, माळकवठे , चिंचपूर या गावांपर्यंत पोहोचवावे आणि महावितरणने वीज पुरवठ्याची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मागण्या मान्य न झाल्यास ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.























