मोडनिंब – (ता. माढा) येथील बसस्थानकात महिलांसाठी स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृह उभारण्याच्या प्रमुख मागणीसह विविध प्रश्नांकडे परिवहन विभागाचे लक्ष वेधण्यासाठी प्रदीप गिड्डे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण गुरुवारी (दि. ५) मागे घेतले. सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी आणि शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. प्रशासनाकडून मागण्यांबाबत आश्वासन मिळाल्यानंतर त्यांच्या हस्ते उपोषण सोडविण्यात आले.
मोडनिंब बसस्थानकात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृह उभारण्याची मागणी आंदोलनातून प्राधान्याने करण्यात आली.बसस्थानकात न थांबणाऱ्या बसच्या चालक व वाहकांवर थेट कारवाई करण्यात येईल, असे विभाग नियंत्रकांनी स्पष्ट केले.
बसस्थानकातील स्वच्छतागृहांची दुरुस्ती व मूलभूत सुविधांबाबत महिनाअखेरपर्यंत कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. तसेच अतिरिक्त वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती करण्याबाबतही सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले. यानंतर प्रदीप गिड्डे यांनी आमरण उपोषण मागे घेतले.याप्रसंगी शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश जाधव, दिपक सुर्वे, उदय माने, किरण यादव, सागर चव्हाण यासह प्रवासी ग्रामस्थ उपस्थित होते.