सोलापूर : थोर पर्यावरणवादी, निसर्गअभ्यासक आणि साहित्यिक, अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांनी आपले संपूर्ण आयुष्य निसर्गाच्या रहस्यांचा शोध घेणे, त्याचा सखोल अभ्यास करणे आणि निसर्गसंपदेचे संवर्धन करणे यासाठी समर्पित केले. त्यांच्या अथक परिश्रमांतून, अखंड ध्यासातून आणि निरंतर भटकंतीतून साकारलेले प्रयोग, मौलिक नोंदी, विपुल साहित्य तसेच विविध भाषांतील आणि जगभरातील दुर्मिळ ग्रंथ हा समाजासाठी अमूल्य ठेवा आहे. या समृद्ध वारशाचे जतन व्हावे, नव्या पिढीला निसर्गाचा सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा मिळावी आणि भावी संशोधकांना पर्यावरणविषयक संदर्भसाहित्य सहज उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने या संदर्भ ग्रंथालयाची उभारणी करण्यात आली आहे, असे प्रतिपादन उद्घाटक तथा प्रमुख वक्ते इंद्रजित भालेराव यांनी केले.
या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार करण्याची जबाबदारी समर्थपणे पेलणारे श्रीनिवास चित्तमपल्ली आणि श्रीकांत चित्तमपल्ली यांचा त्यांनी विशेष गौरव केला.
या ग्रंथालयाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या वेबसाइटचे लोकार्पण सोलापूरचे पोलीस आयुक्त मा. एम. राजकुमार यांच्या हस्ते रिमोटचे बटण दाबून करण्यात आले. अरण्यऋषींचे मानवकल्याण आणि निसर्गसंवर्धनविषयक कार्य विविध प्रकारच्या योगदानातून कशा पद्धतीने जिवंत ठेवता येते, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रा. प्रकाश महानवर यांनी आपल्या मनोगतात अरण्यऋषींच्या उदात्त योगदानाचा गौरव केला. निसर्गप्रेमींनी जिथे शक्य होईल तिथे वृक्षारोपण करून त्यांचे काळजीपूर्वक संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यापीठाच्या परिसरात वनराई फुलवून मारुती चित्तमपल्ली यांच्या स्मृती जतन करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सौ. रोहिणी तडवळकर (भाजप शहराध्यक्ष), मा. विमलताई माळी (आधुनिक बहिणाबाई) आणि मा. डॉ. लोकशाहीर शिवरत्न शेटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. विजयकुमार भोसले यांनी ग्रंथालयाच्या कार्यासाठी २५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. प्रा. सुहास पुजारी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मारुती चित्तमपल्ली यांच्या मराठी भाषेतील योगदानाचा विशेष उल्लेख केला.
ते म्हणाले, “जंगलातील वनस्पती, पशू-पक्ष्यांच्या शेकडो जाती, त्यांच्या शरीराची रचना, सवयी आणि जीवनचक्र यांसंदर्भात पूर्वी मराठी भाषेत स्वतंत्र आणि अचूक तांत्रिक शब्दांची कमतरता होती. चित्तमपल्ली यांनी पक्षिशास्त्र आणि प्राणीशास्त्रातील हजारो इंग्रजी व लॅटिन शास्त्रीय संज्ञांसाठी अतिशय सुंदर, अर्थपूर्ण आणि सुसंस्कृत मराठी प्रतिशब्द शोधले व ते रूढ केले.”
ते पुढे म्हणाले, “चित्तमपल्ली यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ जंगलात तसेच माडिया गोंड, पारधी आणि अन्य आदिवासी समाजातील लोकांच्या सहवासात घालवला. या आदिवासी बांधवांकडे आणि वन्यजीवांच्या सान्निध्यात राहणाऱ्या ग्रामीण लोकांकडे निसर्गाशी संबंधित शब्दसंपत्तीचा एक मोठा खजिना होता. ही शब्दसंपत्ती पुस्तकी मराठीत आढळत नव्हती. त्यांनी बोलीभाषेतील अस्सल देशी शब्द, म्हणी, वाक्प्रचार आणि निसर्गविषयक संज्ञा काळजीपूर्वक टिपून त्या मुख्य प्रवाहातील मराठी भाषेत आणल्या. अशा प्रकारे जंगलाच्या मूक आणि अफाट विश्वाला मराठी शब्दांचे सुंदर लेणे देणारे ते एक महत्त्वपूर्ण शिल्पकार ठरले.”
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर विभागीय वनाधिकारी लक्ष्मण आवारे, श्रीनिवास चित्तमपल्ली, श्रीकांत चित्तमपल्ली आणि राजकुमार हंचाटे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय जोगीपेठकर, श्रद्धानंद नरवणे, गजानन होनराव, सुरेश येळमेली, सतीश नोमुल, राहुल म्हमाणे, सचिन पतंगे, काशिनाथ बिराजदार, शंकर गाडी आणि गुरुशांतप्पा ढगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी तडवळकर यांनी केले, तर शतावरी चित्तमपल्ली यांनी आभार मानले.























