सोलापूर – दिवाळीच्या मंगल पर्वावर सामाजिक बांधिलकी जपत ‘सारथी युथ फाऊंडेशन’च्या व्यसनमुक्ती अभियानांतर्गत सोलापुरात एका विशेष जनजागृती व आनंदवाटप उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. “व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया” आणि “इतरांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरवून दिवाळी साजरी करूया” या प्रेरणादायी संदेशासह पार पडलेल्या या उपक्रमाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात भवानी पेठ येथील ‘वेव्ह्ज डान्स अकॅडमी’चे संचालक व प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक राकेश मनोहर सोनी यांची अतिथी नृत्यप्रशिक्षक म्हणून प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थित युवकांना मोफत नृत्यप्रशिक्षण, झुंबा सत्र आणि शारीरिक तंदुरुस्तीविषयक मार्गदर्शन करून नृत्याच्या तालावर निरोगी व व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश दिला.
विविध मनोरंजनात्मक खेळ घेऊन सर्वांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आला तसेच उपस्थितांना दिव्यांचे वाटप करण्यात आले. व्यसनमुक्तीचा संदेश देणारी रांगोळी व फुलांची आकर्षक सजावट या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. या सामाजिक सजावटीसोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर फोटो शेअर करण्याची स्पर्धाही रंगली, ज्यातून डिजिटल माध्यमातून हा सकारात्मक संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला.
हा विधायक उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्वेता पाटील, स्नेहा चौगुले, भाग्यश्री शिगरकंटी, लक्ष्मी शिगरकंटी, श्रावणी मुदगल, श्रेया मुदगल, समर्थ कोळी, समृद्धी वाघमारे, श्रीकन्या गोसावी, वेदांत चाबुकस्वार, रोहन चाबुकस्वार, वैष्णवी चाबुकस्वार, कार्तिक चाबुकस्वार, अरमान शेख, नागेश्वर स्वामी, शक्ती स्वामी, दिव्यानी चौगुले आणि सोनाक्षी पवार या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
नृत्य, कला, आरोग्य आणि सामाजिक जाणिवांची सांगड घालून दिवाळी अर्थपूर्ण पद्धतीने साजरी करणाऱ्या या उपक्रमाचे शहरातून मोठे कौतुक होत आहे.


















