मंगळवेढा – जत तालुक्यातील उमदीपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील श्री क्षेत्र हुलजंती येथील श्री महालिंगराया देवस्थानची यात्रा सध्या सुरू आहे. महाराष्ट्रातील जागृत देवस्थान आणि श्री हालमत संप्रदायाचे भू-कैलास म्हणून श्री क्षेत्र हुलजंती येथील महालिंगराया देवस्थानची सर्वदूर ख्याती आहे. बिरोबा व महालिंगराया यांच्यातील गुरु-शिष्य नात्याचे प्रतीक असलेला ऐतिहासिक पालखी भेट सोहळा हा यात्रेचा मुख्य आकर्षणबिंदू आहे. आज सोमवारी (दि. ९ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता हुन्नूरचे गुरू श्री बिरोबा आणि त्यांचे शिष्य श्री महालिंगराया यांच्या पालख्यांचा अभूतपूर्व भेट सोहळा रंगणार आहे.
या दिव्य सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि गोवा या राज्यांतून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. लाखो भक्तांना हा नयनरम्य आणि भक्तिमय सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्याची पर्वणी लाभणार आहे. महालिंगरायाला यात्रेच्या मुख्य दिवशी नैवेद्य अर्पण करण्याचा मान जतच्या डफळे संस्थानिक राजघराण्याला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही पूर्वापार परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे.
मध्यरात्री मुंडास सोहळा; कैलासातून शंकर-पार्वती येत असल्याची भक्तांची श्रद्धा
मुख्य पालखी भेट सोहळ्याच्या आदल्या दिवशी रात्री बारा वाजता मंदिरात मुंडास सोहळा पार पडतो. मध्यरात्री कैलासातून शंकर-पार्वती येऊन महालिंगराया मंदिराच्या पंचशिखराला (मुंडास) आहेर करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यावेळी देवाची मूक भाकणूक झाली, अशीही भक्तांची पूर्वापार धारणा आहे. या धार्मिक विधीला विशेष महत्त्व असून हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवस्थानच्या बाजूने वाहणाऱ्या हालहळ ओढ्यात श्री बिरोबा आणि श्री महालिंगराया या गुरु-शिष्यांच्या पालख्यांचा मुख्य भेट सोहळा संपन्न होतो.
सात मानाच्या पालख्यांचा भेट सोहळा
गुरु-शिष्यांच्या पालखी भेटीनंतर नगारा, ढोल आणि कैताळ यांच्या गजरात विविध देवतांच्या पालख्या महालिंगराया पालखीची भेट घेतात. यावेळी ‘महालिंगराया-बिरोबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात आकाशात भंडारा, लोकर, खारीक व खोबऱ्याची उधळण केली जाते. नगारा आणि ढोलांच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो.
मुख्य गुरु-शिष्य भेट सोहळ्यापूर्वी सात मानाच्या पालख्यांचा भेटीचा मान असतो. यामध्ये बिजर्गीचे बुळाप्पा, जत तालुक्यातील सोन्याळ येथील विठुराया, उटगी येथील ब्रह्मदेव, कर्नाटकातील शिरडोण येथील बिरोबा व शीलवंती, जिरांकलगीचे बिरोबा आणि खसगीचे बर्गालसिद्ध या देवतांच्या पालख्यांचा समावेश आहे.
हा भक्तिमय सोहळा आठवडाभर सुरू असतो. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि गोवा राज्यांतून दाखल झालेल्या भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तिभावाने पार पडतो. यात्रेसाठी देवस्थान परिसरात पिण्याच्या पाण्याची आणि वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
महालिंगरायांच्या कार्याची ऐतिहासिक परंपरा
श्री महालिंगराया हे वीर (सिद्ध) पुरुष बारामती येथे मासाळ घराण्यात जन्माला आले. त्यांनी आपल्या जीवनकार्यातून अनेक भक्तांना चमत्कारिक अनुभूती दिली. दुष्टांचा संहार करून सज्जनांचे रक्षण केले, समाजजागृती केली. आपले गुरू श्री बिरोबा यांना गुरुस्थानी ठेवून गुरुभक्ती कशी करावी, याचा आदर्श त्यांनी आपल्या आचरणातून भक्तांसमोर ठेवला.
मंगळवेढ्यापासून दक्षिणेला २२ किलोमीटर अंतरावर असलेले हुलजंती हे भू-कैलास, दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. मंदिरासमोरूनच मंगळवेढा-उमदी-विजापूर राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने भाविक आणि प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. बाराव्या शतकातील दगडी आणि कोरीव आकर्षक मंदिर स्थापत्य हे या देवस्थानचे वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या स्वागत कमानीचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे या पवित्र क्षेत्राला भेट देणारा प्रत्येक भाविक काही काळ थांबून दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही.
चौकट
हुलजंती-महालिंगराया आणि जतचे ऐतिहासिक धार्मिक संबंध
श्री महालिंगराया देवस्थानच्या यात्रेतील मुख्य दिवशी देवाला नैवेद्य अर्पण करण्याचा मान जत येथील डफळे संस्थानिक राजघराण्याला आहे. ही परंपरा आजही पूर्वापार पद्धतीने सुरू आहे. श्री महालिंगरायांचे गुरू श्री बिरोबा हे मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथील असून, पूर्वी हे गाव तत्कालीन जतच्या डफळे संस्थानिकांच्या अधिपत्याखाली होते. त्यामुळे या दोन्ही देवस्थानांशी डफळे राजघराण्याचे ऐतिहासिक आणि धार्मिक संबंध आहेत. आजही दोन्ही देवस्थानांच्या ठिकाणी डफळे राजघराण्याला विशेष मान-सन्मान दिला जातो.
हुलजंती हे जत तालुक्यातील उमदीपासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गालगत वसलेले आहे. जत तालुक्यातील उटगी येथील ब्रह्मदेव आणि सोन्याळ येथील विठुराया या देवतांच्या पालख्यांनाही भेट सोहळ्यात मानाचे स्थान आहे. त्यामुळे जत आणि हुलजंती या परिसरातील धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नाते अधिक दृढ झाले आहे.
कोट
हालमत धर्माची काशी अर्थात भू-कैलास!
श्री महालिंगरायांनी शिरडोण (शिगीमठ) येथे आपल्या गुरूंचा मठ स्थापन केला होता. त्या मठात त्यांनी अनंतकाळपर्यंत गुरुभक्ती केली, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्याच काळात त्यांनी लिंबाळ डोंगरातील वाघिणीचे दूध स्वतः काढून आणून गुरू बिरोबांना अर्पण केले होते. त्या वाघिणीच्या स्मरणार्थ जिंती नारायणपूर या गावाला महालिंगरायांनी ‘हुलजंती’ असे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. हुलीजयंती या नावावरून पुढे हुलजंती हे नाव रूढ झाले. आज हेच ठिकाण ‘हालमत धर्माची काशी’ आणि ‘भू-कैलास’ म्हणून ओळखले जाते.
Views: 13