परभणी : पाथरी विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकरी आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार राजेश विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली परभणी, पाथरी आणि मानवत या तीन तालुक्यांत तालुकास्तरीय बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. बुधवार, दि. 18 नोव्हेंबरपासून या बैठकांना सुरुवात होणार असून, दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, महसूल मंडळनिहाय कामे आणि आवश्यक वाढीव कामांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली.
या बैठकांमध्ये दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने गावनिहाय तयार केलेले आराखडे, पाणीटंचाई, शेतीविषयक समस्या, पशुधनासाठी चारा व पाणी व्यवस्था तसेच विविध शासकीय विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच सरपंच यांच्या सूचनांनुसार गावांमध्ये आणखी कोणती कामे घेणे आवश्यक आहे, याचीही माहिती जाणून घेतली जाणार आहे. बैठकीस परभणी व पाथरीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जलसंधारण विभाग, बालविकास प्रकल्प अधिकारी, सहकार विभागाचे सहायक निबंधक, पशुवैद्यकीय अधिकारी, महावितरणचे उपअभियंता आदी विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बुधवार दि.18 रोजी परभणी तालुक्याची बैठक दु.1 वा. बी रघुनाथ सभागृह येथे होणार आहे. गुरूवार दि. 19 रोजी स.11 वा पाथरी येथील अंजली मंगल कार्यालयात तर दु.2 वाजता मानवत येथील रेणुका मंगल कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे.
दुष्काळासंदर्भातील समस्या आणि आवश्यक उपाययोजनांबाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच सरपंच यांनी सविस्तर लेखी निवेदने घेऊन बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार राजेश विटेकर यांनी केले आहे. सोनपेठ तालुक्याची दुष्काळ आढावा बैठक नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















