कुर्डूवाडी – कुंपणच शेत खाते असा प्रकार कुर्डूवाडी एसटी बस आगारातील एका सुरक्षा रक्षकानेच एस.टी. बसच्या टाकीतील डिझेल चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाहतूक निरीक्षक गजानन शिरीष दहिंहाडे (वय ३१, रा. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षक बाळकृष्ण पोपट कन्हेरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी एस.टी. डेपोच्या विश्रांतीगृहात झोपलेले चालक योगेश आत्माराम बसवंत हे लघुशंकेसाठी उठले होते. त्यावेळी डेपोमध्ये कामावर असलेला सुरक्षा रक्षक बाळकृष्ण पोपट कन्हेरे हा एस.टी. बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३५१२) च्या डिझेल टाकीतून डिझेल चोरून एका पांढऱ्या रंगाच्या कॅनमध्ये भरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चालक बसवंत यांनी तात्काळ फोनवरून याची माहिती वाहतूक निरीक्षक गजानन दहिंहाडे यांना दिली. दहिंहाडे यांनी तातडीने आगारात धाव घेत सुरक्षा रक्षक कन्हेरे याच्याकडे विचारणा केली असता, त्याने डिझेल चोरी केल्याची कबुली दिली. या घटनेत ९८ रुपये प्रति लिटर दराने अंदाजे १५ ते २० लिटर डिझेल (एकूण किंमत १,९६० रुपये) चोरीस गेले आहे. त्यानंतर दहिंहाडे यांनी संबंधित सुरक्षा रक्षकाला कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात हजर करून त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
Views: 11