सोलापूर – सुप्रीम कोर्टात आज सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील अपात्र ठरविण्यात आलेल्या सहा माजी संचालकांनी दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर सुनावणी होणार असून अपात्र संचालकांच्या भवितव्याचा अंतिम फैसला होणार आहे.
माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय शिंदे, दिलीप माने, जयवंतराव जगताप, सुरेश हसापुरे आणि बबनराव आवताडे या सहा माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज कर्जवाटपातील कथित अनियमिततेच्या कारणावरून जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी बाद ठरवले होते.
या निर्णयाविरोधात पुणे विभागीय सहनिबंधक आणि उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दिलासा न मिळाल्याने, या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती आर. महादेवन आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. आता शेवटची आशा असलेल्या सुप्रीम कोर्टाकडून तरी आज दिलासा मिळतो की नाही यावर या सहा नेत्यांची पुढील भूमिका अवलंबून असेल.



















