जेऊर – आदिनाथ सहकारी साखर कारखाना, भाळवणी आणि केम या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले होते; मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या काही दिवसांतच या रस्त्याची अवस्था पुन्हा ‘जैसे थे’ झाली असून, संपूर्ण रस्ता खड्डेमय व बिकट बनला आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक करणारी वाहने, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक प्रवास करतात. काही दिवसांपूर्वी खड्डे बुजवण्यात आल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतु, खड्डे बुजवताना केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याने अवघ्या काही दिवसांतच खडी उखडून पुन्हा मोठमोठे खड्डे पडले आहेत.
रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, वाहनचालकांना खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले असून वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. ऊस गळीत हंगामाच्या काळात या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढलेली असताना रस्त्याची अशी दुरवस्था होणे धोकादायक ठरत आहे.
Views: 11