बार्शी – बार्शी उपसा सिंचन योजनेच्या गाताचीवाडी शिवारात रखडलेल्या सुमारे अर्धा किलोमीटर कामासह तावडी गावानजीक सुरु असलेल्या कामांची आमदार राजेंद्र राऊत यांनी पाहणी केली व युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सर्वसंबंधितांना दिल्या.
यावेळी उपअभियंता अतुल गायकवाड, शाखा अभियंता दयानंद उंबरे, संजय होनखांबे, ज्येष्ठ नेते कौरव माने, सरपंच गहिनीनाथ गात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आमदार राऊत म्हणाले, बार्शी उपसा सिंचन योजना १९९६ मध्ये सुरु झाली. मात्र, पुरेशा निधीअभावी योजना रखडत राहिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या योजनेला ७०० कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली व त्यानंतर सुमारे ४५० कोटी रुपयांची कामे टेंडरद्वारे सुरु करण्यात आली आहेत. पाइपलाइन आणि कालव्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. जानेवारी महिन्यात बार्शी उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सोडून तावडी लघु प्रकल्पात पाणी आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या पाण्यामुळे तावडीसह सौंदरे, कव्हे परिसरातील शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. तावडी लघु प्रकल्पात पाणी आल्यानंतर तेथून पुढे ही या योजनेची उर्वरित कामेही पूर्ण केली जातील.
आपण शेतकरी असल्याने शेतीसाठी पाणी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना किती आनंद होतो हे आपण जाणतो. उपसा सिंचन योजनेमुळे या भागातील शेती मोठ्या प्रमाणात ओलिताखाली येणार आहे. उर्वरित २५० कोटी रुपयांचा निधी देखील लवकरच मिळेल, असे त्यांनी सांगितले.
आमदार राऊत पुढे म्हणाले, कृष्णा फ्लड डायव्हर्जनमधून उजनीत पाणी आणण्यासाठी कार्यवाही सुरु आहे. हे पाणी उजनीत आणल्यानंतर आणखी वाढीव ५ टीएमसी पाणी बार्शीला आणण्याचा प्रयत्न आहे. आगामी ५-७ वर्षात हे काम होईल अशी शक्यता आहे. हे सर्व पाणी बार्शी तालुक्याला मिळाल्यानंतर तालुक्यातील सुमारे ७५ टक्के क्षेत्र ओलिताखाली येईल असा विश्वास व्यक्त केला.
कालवा समितीच्या बैठकीत पाणी सोडण्याची विनंती
कालवा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली. कांही ठिकाणी शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर, ठिबक आणि रेन पाइपचा वापर करून कमी पाण्यात जमीन ओलवून ज्वारीची पेरणी केली आहे. अशा पिकांना पाण्याची गरज आहे. सध्या जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर असून, कडब्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे रब्बी पिकांना पाणी मिळाल्यास चारा आणि अन्नधान्याच्या संकटावर काही प्रमाणात मात करता येईल, असे राऊत यांनी सांगितले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत जानेवारीमध्ये आवर्तन सोडण्याबाबत विनंती करण्यात आली असून, जानेवारीमध्ये पाणी सोडले जाण्याची अपेक्षा आहे. हे आवर्तन साधारण ३० ते ४५ दिवस सुरु राहण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाण्याचा काटकसरीने वापर करा
शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देताना पाटाने पाणी देण्याऐवजी ठिबक, तुषार सिंचन, स्प्रिंकलर, रेन पाईप याचा वापर करुन कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेण्याचे आवाहन राऊत यांनी केले.