सोलापूर : डफरीन चौक येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), सोलापूरच्या आलिशा शेख हिने अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा २०२६ मध्ये ९६ टक्के गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. टेक्स्टाईल वेट प्रोसेसिंग टेक्निशियन या दोन वर्षांच्या अभियांत्रिकी व्यवसाय अभ्यासक्रमात तिने मिळविलेल्या या यशामुळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आलिशाला या यशासाठी शिल्पनिदेशक अंबादास लोला यांचे मार्गदर्शन लाभले. शनिवारी डफरीन चौक येथील महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित कौशल्य दीक्षांत समारंभात आयएमसीचे अध्यक्ष प्रफुलकुमार वेद आणि संस्थेच्या प्राचार्या कु. इंदिरा रणभिडकर यांच्या हस्ते आलिशाचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेतील विविध व्यवसायांमध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रथम तीन क्रमांकाच्या प्रशिक्षणार्थींचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला गटनिदेशक एम. ए. पाटील, आर. जे. शिकलगार, शिक्षकवृंद, कर्मचारी, पालक आणि मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक चंदालिया यांनी केले. समारंभ यशस्वी करण्यासाठी टी. बी. तांबे, पी. एस. सुतार, एस. बी. कोळेकर, एस. एम. भीमनवरू, पी. व्ही. दराडे, ए. के. तांबोली, ए. एस. दिलपाक, ए. ए. सय्यद यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थींनी विशेष परिश्रम घेतले.
लखनौला जाता आले नाही
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने लखनौ येथे आयोजित दीक्षांत समारंभासाठी आलिशा शेख हिला निमंत्रित करण्यात आले होते. देशात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तेथे तिचा गौरव होणार होता. मात्र, कौटुंबिक अडचणींमुळे तिला लखनौला उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे सोलापुरातच आयोजित समारंभात तिने सत्कार स्वीकारला.
—-
Views: 14