मंद्रूप : मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, जवान आणि निष्पाप नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंद्रूप पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुवारी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रक्तदान शिबिर, महिला सक्षमीकरण आणि सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यात आली. रक्तदान शिबिरात २७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात तरुणांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. रक्तदानासोबतच महिला सक्षमीकरण आणि सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षिततेबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ, उत्कृष्ट पोलीस पाटील, ग्राम सुरक्षा सेवक तसेच ग्राम सुरक्षा दलातील युवकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन परि. पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास करंडे, पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, पोलीस पाटील तसेच इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. शहीद जवानांच्या स्मृती जपत सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Views: 11